1 जुलैपासून कागदी नोटा बंद होणार? PIB फॅक्ट चेकमध्ये समोर आलं सत्य
Tv9 Marathi June 10, 2026 05:45 PM

येत्या ३० जून २०२६ पर्यंत केंद्र सरकार देशातील सर्व कागदी नोटा चलनातून बाद करणार असून त्यांच्या जागी संपूर्णपणे प्लास्टिकच्या नोटा आणल्या जाणार आहेत, असा मेसेज सध्या व्हायरल होत आहे. जर तुम्हीही सोशल मीडिया किंवा व्हॉट्सॲपवर असा एखादा मेसेज वाचला असेल आणि चिंतेत पडला असाल, तर क्षणभर थांबा. हा व्हायरल झालेला दावा पूर्णपणे खोटा, बनावट आणि दिशाभूल करणारा आहे. भारत सरकारच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने (PIB) या व्हायरल बातमीची गंभीर दखल घेत याचे फॅक्ट चेक (Fact Check) केला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचा (RBI) असा कोणताही विचार किंवा हेतू नाही. त्यामुळे तुमच्या खिशातील, घरातील किंवा बँकेतील कागदी नोटा पूर्णपणे सुरक्षित आणि वैध आहेत, असे स्पष्टीकरण सरकारने दिले आहे.

सोशल मीडियावर नेमकी अफवा काय?

गेल्या काही दिवसांपासून विविध डिजिटल प्लॅटफॉर्म्स आणि मेसेजिंग ॲप्सवर एक संदेश तुफान व्हायरल होत आहे. या संदेशात असा दावा करण्यात आला होता की, या महिन्याच्या अखेरपर्यंत म्हणजेच ३० जून २०२६ पर्यंत देशात एक खूप मोठा आर्थिक बदल केला जाणार आहे. रिझर्व्ह बँक सध्याचे सर्व कागदी चलन टप्प्याटप्प्याने मागे घेईल. यानंतर बाजारात फक्त प्लास्टिकच्या नोटाच वैध राहतील, असे यात म्हटले होते.

या मेसेजमध्ये वापरण्यात आलेल्या भाषेमुळे सामान्य नागरिकांपासून ते लहान-मोठ्या व्यापाऱ्यांपर्यंत सर्वांमध्येच भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. आपल्याकडील नोटा रातोरात कागदाचा तुकडा ठरतील की काय? किंवा बचत करून ठेवलेले पैसे पुन्हा बँकेत जमा करण्यासाठी रांगा लावाव्या लागतील का? अशा विविध शंका नागरिकांकडून उपस्थित केल्या जात होता. यामुळे लोक अत्यंत काळजीत पडले होते. तसेच यामुळे बाजारातील दैनंदिन व्यवहारांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली होती.

पीआयबी फॅक्ट चेकने उघड केले खरे सत्य

नागरिकांमधील वाढती भीती आणि गोंधळ लक्षात घेऊन केंद्र सरकारने तातडीने यात हस्तक्षेप करत स्पष्टीकरण दिले आहे. सरकारी स्तरावर अशा अफवांचे खंडन करणारी एजन्सी असलेल्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने (PIB) मंगळवारी रात्री उशिरा या प्रकरणाचे सत्य जनतेसमोर आणले. पीआयबी फॅक्ट चेकने आपल्या अधिकृत X अकाउंटवरून एक पत्रक जारी केले आहे.

या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, सोशल मीडियावर सध्या करण्यात आलेला हा दावा १०० टक्के खोटा आणि आधारहीन आहे. केंद्रीय बँक म्हणजेच आरबीआयने (RBI) कागदी नोटा बंद करण्याबाबत किंवा प्लास्टिक चलन आणण्याबाबत असा कोणताही आदेश, परिपत्रक किंवा अधिसूचना जारी केलेली नाही. नागरिकांनी अशा कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये.

Several social media posts are falsely claiming that RBI will withdraw paper currency notes and replace them with plastic currency notes from June 30, 2026.#PIBFactCheck

❌ This claim is #Fake

✅ According to @RBI, there are no plans to withdraw paper currency notes or… pic.twitter.com/dhZqANjip9

— PIB Fact Check (@PIBFactCheck) June 9, 2026

तुमच्या खिशातील नोटा पूर्णपणे सुरक्षित; सरकारचे आश्वासन

केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँके जनतेला पूर्णपणे आश्वस्त करत आहे की, देशाची सध्याची चलन रचना (Currency System) जशी आहे तशीच अबाधित राहील तुमच्या घरी, बँकेत, व्यवसायात किंवा खिशात असणाऱ्या सर्व कागदी नोटा कायदेशीर चलन (Legal Tender) म्हणून कायम राहतील. बाजारात खरेदी-विक्री करताना या नोटा स्वीकारण्यास कोणीही नकार देऊ शकत नाही.

प्रशासनाचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन

दरम्यान याच पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांनी जनतेला कठोर इशारा दिला आहे. कोणत्याही मेसेजची सत्यता पडताळून न पाहता तो सोशल मीडियावर किंवा व्हॉट्सॲप ग्रुप्सवर पुढे करू नका. अधिकृत आणि खऱ्या माहितीसाठी नेहमी आरबीआय किंवा सरकारच्या अधिकृत संकेतस्थळांनाच प्राधान्य द्या,असा सल्ला दिला आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.