तात्या लांडगे
सोलापूर : शहरी भागातील गॅस एजन्सीचे ग्राहक ग्रामीण भागातही आहेत. शहरात २५ दिवसांनंतर सिलिंडर मिळत आहे, तर ग्रामीण भागातील एजन्सीच्या ग्राहकांना दुसऱ्या सिलिंडरसाठी ४५ दिवसांची वाट पाहावी लागत आहे. शहरांमधील गॅस कनेक्शन धारकांच्या नावे बुकिंग करून त्यांचे सिलिंडर जादा दराने हातगाडे किंवा हॉटेल व्यावसायिकांना दिले जात असल्याचा आरोप होत आहे.
सोलापूर शहरातील भजीपाव, चायनीज, वडापाव, मच्छी फ्राय आदी खाद्यपदार्थांच्या हातगाड्यांवरील घरगुती गॅस टाक्यांवरून ते सिद्ध होत असल्याचे बोलले जात आहे. सध्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत ३,१७० रुपये आहे, तर घरगुती सिलिंडर ९५० रुपयांना मिळतो. केंद्र सरकारने गोरगरीब कुटुंबांतील महिलांसाठी प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना सुरू केली. त्यातून दरवर्षी नऊ सिलिंडरसाठी सबसिडी देण्याचा निर्णय झाला. सोलापूर जिल्ह्यात या योजनेच्या सुमारे पावणेदोन लाख महिला लाभार्थी आहेत. त्यांना आता वर्षातील चार सिलिंडरवरच सबसिडी मिळणार आहे.
याशिवाय राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू केली होती. त्यातून उज्ज्वला योजनेसह लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींना दरवर्षी तीन सिलिंडर मोफत दिले जाणार होते. मात्र, शासन निर्णय निघूनही ही योजना कागदावरच राहिली. आता घरगुती सिलिंडरचे दरही वाढले आहेत. दरम्यान, सोलापूर शहर व जिल्ह्यात दोन लाख गॅस कनेक्शनधारक आहेत. त्यांपैकी चार लाख ग्राहकांकडे दोन-दोन कनेक्शन आहेत. दोन कनेक्शन असलेल्यांना शहरी भागात ३५ दिवसांनंतर सिलिंडर मिळतो. मात्र, त्यासाठी ऑनलाइन बुकिंगचे बंधन अद्याप कायम आहे.
बुकिंग केल्यानंतर वेळेत मिळतो गॅस सिलिंडर
प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थींना आता वर्षातील चार गॅस सिलिंडरवर सबसिडी मिळणार आहे. पूर्वी नऊ सिलिंडरवर सबसिडी मिळत होती. सोलापूर जिल्ह्यात या योजनेचे अंदाजे एक लाख ७० हजार लाभार्थी आहेत. दरम्यान, सध्या शहरी भागात घरगुती सिलिंडर २५ दिवसांनी, तर डबल कनेक्शन असलेल्यांना ३५ दिवसांनंतर सिलिंडर मिळतो. बुकिंग केलेल्या ग्राहकांना ठरलेल्या दिवशी सिलिंडर मिळतोच.
- ओंकार पडोळे, अन्नधान्य वितरण अधिकारी, सोलापूर शहर
घरगुती सिलिंडरसाठी ५० रुपये जादा
गावागावांतील गॅस वितरक ग्राहकांसाठी एजन्सीकडून सिलिंडर आणतात. देशात किंवा राज्यात सिलिंडरचा दर कितीही असो, त्याहून ५० रुपये जादा घेतले जातात. वाहतूक खर्चाचे ते पैसे असल्याचे ग्राहकांना सांगितले जाते. गावातच सिलिंडर मिळत असल्याने ग्राहकांना हे जादा पैसे द्यावे लागतात.