Prasad Vedpathak White Line Controversy: गेल्या काही दिवसांपासून घाटकोपरमधल्या सोसायटीत जैन साध्वींसाठी मारण्यात आलेल्या पांढऱ्या पट्टीचा मुद्दा चर्चेत होता. प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर (Social Media Influencer), कंटेंट क्रिएटर (Content Creator) आणि युट्यूबर प्रसाद वेदपाठक (YouTuber Prasad Vedpathak) राहत असलेल्या सोसायटीमध्ये जैन कुटुंबीयांनी कुणाच्याही परवानगीशिवाय पांढरी पट्टी मारलेली. स्वतः राहत असलेल्या सोसायटीत मारलेल्या पांढऱ्या पट्ट्यामुळे त्याच्यासह त्याची पत्नी आणि आईच्या धार्मिक भावना दुखावल्याचा दावाही प्रसाद वेदपाठक यानं केलेला. आता प्रसाद वेदपाठकच्या सोसायटीमधली पांढरी पट्टी हटवण्यात आली असून प्रसाद वेदपाठकनं "माझ्यासाठी हा प्रश्न संपला...", अशा आशयाची पोस्ट करुन पांढरी पट्टी हटवल्याचा व्हिडीओ शेअर केलेला. अशातच आता पांढरी पट्टी हटवल्याच्या प्रसाद वेदपाठकच्या पोस्टवर काही जैन धर्मीय आक्रमक होत वादग्रस्त पोस्ट करत आहेत. सध्या सोशल मीडियावर या पोस्टचा स्क्रिनशॉर्ट व्हायरल होत असून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
फेसबुकवर व्हायरल होणाऱ्या स्क्रिनशॉर्टमध्ये नेमकं काय?
फेसबुकवर व्हायरल होणारा स्क्रिनशॉर्टमध्ये प्रसाद वेदपाठकनं त्याच्या सोसायटीमधील पांढरी पट्टी हटवल्याचं जे ट्वीट टाकलेलं त्याचा आहे. त्याचं ट्वीट रिट्वीट करत एका व्यक्तीनं वादग्रस्त पोस्ट केली आहे. श्रमण नावाच्या ट्विटर हँडलवरुन प्रसाद वेदपाठकचं ट्वीट रिट्वीट करण्यात आलंय. त्यात लिहिलंय की, "आपण जैनांनी मुंबईत केवळ जैनांसाठीच असलेल्या स्वतंत्र वसाहती (सोसायट्या) उभारल्या पाहिजेत आणि त्यामध्ये कोणत्याही मराठी व्यक्तीला प्रवेश देऊ नये. आपण त्यांना दाखवून दिले पाहिजे की या शहरावर आपले वर्चस्व आहे आणि आपणच इथले सर्वेसर्वा आहोत... दिगंबर आणि श्वेतांबर अशा दोन्ही पंथांमधील जैन बिल्डरांनी या उपक्रमाची सुरुवात करावी आणि त्याचा विस्तार प्रत्येक शहरात करावा..."

फेसबुकवरच्या 'अजिंठा' नावाच्या पेजनं या वादग्रस्त पोस्टचा स्क्रिनशॉर्ट शेअर केला आहे. तसेच, स्क्रिनशॉर्ट शेअर करताना लिहिलंय की, "हा ह्यांचा खरा चेहरा आहे. "जैन ओन्ली सोसायट्या तयार करून मराठी लोकांना हाकला", म्हणतोय हा गडी. मुंबईवर राज्य करणार म्हणतोय. अरे शहरावर राज्य करायला तू स्वतःला डॉन नंबर वन सुर्याभाई समजतोय की काय? गावागावात जैनओन्ली सोसायट्या बनवण्यापेक्षा तू एक स्वतंत्र देश जैनिस्थान बनवून त्यातच शिफ्ट का नाही होत? त्या देशातले रस्ते काळ्या डांबराऐवजी पांढऱ्या फेव्हीकॉलने बनवून घे. आम्ही काही म्हणणार नाही..."
प्रसाद वेदपाठकच्या सोसायटीत उद्भवलेला पांढऱ्या पट्टीचा वाद नेमका काय?
प्रसाद वेदपाठक याच्या सोसायटीत काही जैन समाजातील लोकांनी ही पांढऱ्या रंगाची पट्टी मारलेली. यावर प्रसाद वेदपाठक यानं प्रश्न उपस्थित करत आपल्या धार्मिक भावना दुखावल्याचं म्हटलं होतं. तसेच, आपल्या सोसायटीच्या आवारात अशी पांढरी पट्टी मारण्यात आली, त्यावेळी आपली परवानगी कुणीच घेतलेली नाही, असा दावाही प्रसाद वेदपाठक यानं केलेला. प्रसाद वेदपाठक यानं दिलेल्या माहितीनुसार, जैन धर्मगुरूंसाठी ही पट्टी मारण्यात आलेली. धार्मिक मान्यता पाळायच्या असतील तर त्या घरी पाळाव्यात सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारच्या कृत्यावर प्रसादनं आक्षेप नोंदवलेला. तसेच, हा धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, त्यामळे ही पट्टी लवकरात लवकर हटवावी, अशी मागणीही प्रसाद वेदपाठक यानं केलेली. त्यानंतर आता त्या पांढऱ्या पट्टीवर रंगकाम करून पट्टी हटवण्यात आल्याचंही प्रसाद वेदपाठकनं व्हिडीओ शेअर करुन सांगितलं आहे.
ABP Majha च्या बातम्या LIVE: