यंदा देशासह राज्यात मान्सूनच आगमन उशिरानं झालं आहे. मान्सून महाराष्ट्रात दाखल झाल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र अजूनही मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापलेला नाहीये, येत्या 15 जूनपर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापू शकतो असा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. यंदाच्या मान्सूनवर अल् निनोचं सावट आहे. त्यामुळे यंदा सरासरी पेक्षा कमी पाऊस पडले असा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. दरम्यान याच संदर्भात आता भारतीय हवामान विभागाकडून नवा अंदाज वर्तवण्यात आला असून, मान्सूनच्या नव्या अंदाजामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आएमडी (IMD) कडून गेल्या आठवड्यात मान्सूनबाबतचा लाँग टर्म अंदाज व्यक्त करण्यात आला होता, त्यावेळी देशात पावसाचं प्रमाण यंदा 92 टक्क्यांपर्यंत राहू शकतं असं हवामान विभागानं म्हटलं होतं.
परंतु आता पुन्हा एकदा भारतीय हवामान विभागाकडून मान्सूनबाबत नवा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नव्या अंदाजामुळे आता तर चिंता आणखी वाढली आहे. भारतीय हवामान विभागाच्या नव्या लाँग टर्म अंदाजानुसार यंदा आता देशात पावसाचं प्रमाण हे केवळ 90 टक्क्यांच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. म्हणजे पुन्हा एकदा देशात 2015 सारखा कोरडा दुष्काळ पडण्याची शक्यता आहे. अनेक राज्यांमध्ये यंदा पावसाचं प्रमाण हे सरारसी पेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. एवढंच नाही तर या अंदाजामध्ये फार तर फार 5 टक्के पुढे मागे होऊ शकतं, असंही हवामान विभागानं म्हटलं आहे.
पावसाचं प्रमाण कसं राहणार
आयएमडीने वर्तवलेल्या अंदाजानुसार यंदा दोन पावसामध्ये प्रचंड मोठा खंड पडण्याची शक्यता आहे. 2015 मध्ये मान्सूनच्या वाटचालीसाठी जसं वातावरण होतं, तसंच वातावरण आता पुन्हा एकदा निर्माण झालं आहे. भारताच्या प्रत्येक राज्यांमध्ये पावसाचं प्रमाण सारखं नसेल काही राज्यांमध्ये चांगला पाऊस देखील होऊ शकतो, तर काही राज्यांमध्ये पावसाचं प्रमाण हे फार कमी राहण्याची शक्यता आहे, असंही हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांनी पेरण्याची घाई करू नये, असं आवाहनही हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.