बल्ले बल्ले बल्ले… भारतीय शेअर बाजाराची मोठी उसळी, सेन्सेक्समध्ये तब्बल 950 अंकांची..
Tv9 Marathi June 12, 2026 02:45 PM

भारतासाठी एक आनंदाची बातमी आज सकाळी सकाळी पुढे आली. गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात रुपयांची मोठी घसरण सुरू होती. इराण आणि अमेरिका युद्धात भारतीय शेअर बाजाराची पार वाट लागली. डॉलर्सच्या किमती वाढत होत्या आणि रुपया सातत्याने घसरत होता. एका मागून एक दणके भारतीय शेअर बाजारात बघायला मिळाली. 12 जूनला शेअर बाजार सुरू होताच मोठी तेजी बघायला मिळाली. तेजीसह व्यवहाराला सुरूवात झाली. सेन्सेक्स 950 पेक्षा अधिक वाढीसह खुला झाला. निफ्टीमध्येही 270 अंकाची वाढ झाली. 23,440 वर व्यवहार करत आहे. ही खरोखरच खूप जास्त मोठी गोष्ट आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात पडझड बघायला मिळाली होती. अनेक कंपन्यांचे शेअर पडत होती.

आज निफ्टीवर श्रीराम फायनान्स, ट्रेंट, हिंदाल्को इंडस्ट्रीज, एल अँड टी आणि आयशर मोटर्स हे सर्वाधिक वाढ झालेले शेअर्स ठरले. ओएनजीसीमध्ये सर्वाधिक घसरण झाली. काल शेअर बाजारात घसरण झाली होती. मात्र, आज सुरूवात जबरदस्त झाली. इराण आणि अमेरिका युद्धात अमेरिकेच्या अध्यक्षांनी युद्धविराम करारावर मोठे भाष्य केले.

त्यांनी म्हटले की, याच आठवड्याच्या शेवटी इराण आणि अमेरिका यांच्यात युद्धविराम करार पूर्ण होतील. त्यानंतर लगेचच शेअर बाजारात तेजी दिसून आली. मध्य पूर्वेत तणाव गेल्या दोन ते तीन दिवसांमध्ये प्रचंड वाढला होता. आज तणाव कमी झाला. त्यानंतर कच्च्या तेलाच्या किमती 90 डॉलर्सने खाली आल्या. त्यानंतर पेंट कंपन्यांच्या व्यवहारात तेजी आली.

कच्च्या तेलाचे कमी दर भारतासाठी फायदेशीर ठरतील. एकदा इराण आणि अमेरिका युद्ध पूर्णपणे थांबले तर कच्च्या तेलाचे भाव कमी होणार आहेत. आता युद्धविरामाबद्दल भाष्य करताच जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे वाढलेले दर कमी झाले. यामुळे रुपया मजबूत होऊ शकतो, बाह्य आर्थिक दबाव कमी होऊ शकतो. गेल्या अनेक दिवसानंतर शेअर बाजारातून आनंदाची बातमी आली. आज भारतीय रुपयातही मजबूती दिसून आली. डॉलरच्या तुलनेत रुपया 39 पैशांनी वधारून 95.37 या पातळीवर खुला झाला.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.