Grampanchyat Reservation : उरुळी कांचन ग्रामपंचायत प्रभाग आरक्षणाने 'कही खुशी कही गम'
esakal June 12, 2026 11:45 PM

- सुनील जगताप

उरुळी कांचन - आज जाहीर झालेल्या उरुळी कांचन ग्रामपंचायत प्रभाग आरक्षणाने 'कही खुशी कही गम' अशी परिस्थिती निर्माण झाल्याने काही मंडळी न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याच्या मनस्थितीत तर काही आपल्या प्रभागात अनुकूल समीकरणे जमविण्याच्या मनस्थितीत वावरताना दिसत होते.

उरुळी कांचन ग्रामपंचायतीसाठी एकूण १७ सदस्य आहेत, त्यापैकी महिलांसाठी आरक्षित जागा ९ तर पुरुषांसाठी ८ आहेत, ९ महिलांपैकी ५ महिला सर्वसाधारण, २ महिला अनुसूचित जाती, २ महिला इतर मागास प्रवर्ग तर ८ पुरुषांपैकी ५ सर्वसाधारण, २ इतर मागास प्रवर्ग, १ अनुसूचित जाती अशी विभागणी आहे. उरुळी कांचन ग्रामपंचायतीचे सरपंच 'पद' जनतेतून निवडले जाणार असून, त्यासाठीचे आरक्षण हे सर्वसाधारण 'महिला' असे आहे.

उरुळी कांचन ग्रामपंचायतच्या सहा वॉर्ड मधील ग्रामपंचायत सदस्य निवडीसाठीचे आरक्षण जाहीर करण्यासाठी आज उरुळी कांचन येथील राम मंदिरात अध्यासी अधिकारी सुरेंद्र जाधव (अव्वल कारकून अप्पर तहसीलदार कार्यालय लोणी काळभोर) यांच्या अध्यक्षतेखाली व अभिषेक धुमाळ (शाखा अभियंता पंचायत समिती हवेली), प्रियंका सुंदर्डे (ग्राम महसूल अधिकारी), टी. एस. पाटील (ग्रामपंचायत अधिकारी), रामलिंग भोसले (महसूल कर्मचारी) यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या ग्रामसभेत पुढीलप्रमाणे प्रभाग निहाय आरक्षण जाहीर करण्यात आले.

प्रभाग क्रमांक १, सदस्य संख्या ३. १) अनुसूचित जाती महिला २) सर्वसाधारण महिला ३) सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक २, सदस्य संख्या ३. १) अनुसूचित जाती प्रवर्ग २) इतर मागास प्रवर्ग ३) सर्वसाधारण महिला

प्रभाग क्रमांक ३, सदस्य संख्या ३. १) इतर मागास प्रवर्ग महिला २) सर्वसाधारण महिला ३) सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक ४, सदस्य संख्या २. १) अनुसूचित जाती महिला २) सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक ५, सदस्य संख्या ३. १) इतर मागास प्रवर्ग २) सर्वसाधारण महिला ३) सर्वसाधारण.

प्रभाग क्रमांक ६, सदस्य संख्या ३. १) इतर मागास प्रवर्ग महिला २) सर्वसाधारण महिला ३) सर्वसाधारण

विशेष म्हणजे गावगाडा चालविण्यासाठी सरकारने ५० टक्के वाटा महिलांना दिला असताना आजच्या ग्रामसभेला केवळ आणि केवळ संचिता संतोष कांचन या विद्यमान ग्रामपंचायत सदस्या शेवटी शेवटी हजर होत्या, यावरून हे आरक्षण खरेच महिलांना मुख्य प्रवाहात येण्यासाठी आहे का? पती सांगतील तेथे बसायचे अन सांगतील तेथे सह्या करायच्या एवढ्यासाठीच आहे या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.