Indigenous Electric Boat : शंभर टक्के स्वदेशी इलेक्ट्रिक बोट जलवाहतुकीसाठी सज्ज; परवडणाऱ्या जलवाहतुकीचा मार्ग खुला होणार
esakal June 15, 2026 09:45 PM

- नितीन बिनेकर

मुंबई - भारतीय समुद्रातील वातावरण लक्षात घेऊन देशातील पहिली १०० टक्के स्वदेशी इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी विकसित करण्यात माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एमडीएल) यश आले आहे. या बोटीच्या चाचण्या सध्या सुरू आहेत. संरक्षण क्षेत्रातील अग्रगण्य संस्था असलेल्या एमडीएलचा हा पहिलाच उपक्रम असून, त्यातून सर्वसामान्यांचा खिशाला परवडणारी, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक जलवाहतूक व्यवस्था विकसित होणार आहे.

यापूर्वी विकसित करण्यात आलेल्या हायस्पीड वॉटर टॅक्सीच्या मॉडेलमध्ये सुमारे ६० टक्के परदेशी आणि ४० टक्के भारतीय उपकरणांचा वापर करण्यात आला होता. मात्र भारतीय किनारपट्टीवरील समुद्री परिस्थितीत अपेक्षित कामगिरी न झाल्याने त्या अनुभवाच्या आधारे पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित नवे मॉडेल विकसित करण्यात आले आहे. एमडीएलचा हा प्रयोग देशातील जलवाहतुकीत नवे पर्व सुरू करणारा ठरू शकतो. तसेच भविष्यात सर्वसामान्यांसाठी परवडणारी जलवाहतूक व्यवस्था विकसित करण्यात महत्वाची भूमिका बजावू शकतो असे या क्षेत्रातील तज्ञ सांगतात.

पहिल्या प्रयोगातून मिळाले महत्त्वाचे धडे -

एमडीएलने सुरुवातीला जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणासाठी विकसित केलेल्या दोन इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सीमध्ये परदेशी तंत्रज्ञानाचा अधिक वापर केला होता. भारतीय समुद्रातील उंच लाटा, बदलते हवामान आणि चार्जिंग सुविधांच्या मर्यादा लक्षात घेता बॅटरी व्यवस्थापन आणि सातत्यपूर्ण संचालनात काही अडचणी निर्माण झाल्या.त्यामुळे परदेशी तंत्रज्ञानावर अवलंबून राहण्याऐवजी स्वतंत्र प्रणाली विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

१०० टक्के स्वदेशी तंत्रज्ञानावर -

या अनुभवाच्या आधारे एमडीएलने नव्या पिढीची इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी विकसित केली आहे. यात देशांतर्गत उत्पादित यंत्रसामग्री आणि प्रणालींचा वापर करण्यात आला असून त्यामुळे देखभाल खर्च कमी होण्याबरोबरच भविष्यात मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणेही सुलभ होणार आहे. जलवाहतूक ही केवळ पर्यायी व्यवस्था न राहता दैनंदिन प्रवासाचे प्रभावी साधन व्हावे, हा यामागील उद्देश असल्याचे अधिकाऱ्यांनी ‘दैनिक सकाळ’शी बोलताना सांगितले.

पावसाळ्यात होणार खरी अग्निपरीक्षा -

सध्या या टॅक्सींच्या चाचण्या सुरु असून पावसाळ्यात त्यांची खरी कसोटी लागणार आहे. उंच लाटा, जोरदार वारे आणि कमी दृश्यमानतेच्या परिस्थितीत वेग, स्थिरता, बॅटरी क्षमता, ऊर्जा वापर आणि सुरक्षिततेची तपासणी केली जाणार आहे. या चाचण्या यशस्वी ठरल्यानंतरच व्यावसायिक वापराचा मार्ग मोकळा होणार आहे.

लवकरच जेएनपीटीला दोन बोटी -

एमडीएलने विकसित केलेल्या दोन इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी पुढील टप्प्यात जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणाला सुपूर्द करण्यात येणार आहेत. सुरुवातीला त्यांचा वापर कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी केला जाणार असून, या प्रकल्पाच्या अनुभवाच्या आधारे इतर जलमार्गांवरही अशा सेवांचा विस्तार करण्याची योजना आहे.

जलवाहतुकीत नवा अध्याय -

एमडीएलचा हा प्रकल्प यशस्वी ठरल्यास मुंबईसह देशातील विविध किनारी शहरांमध्ये इलेक्ट्रिक जलवाहतुकीचे नवे जाळे उभे राहू शकते. मुंबई, नवी मुंबई, अलिबाग, गोवा तसेच इतर समुद्रकिनारी भागांमध्येही अशा सेवांचा विस्तार होण्याची शक्यता असून, देशातील जलवाहतुकीत नव्या पर्वाची सुरुवात होऊ शकते.

- पहिल्या मॉडेलमध्ये ६०% विदेशी, ४०% भारतीय उपकरणे

- नव्या मॉडेलमध्ये १००% स्वदेशी तंत्रज्ञान

- चार्जिंग व्यवस्थेतील त्रुटींवर मात

- पावसाळ्यात कठोर समुद्री चाचण्या

- यशस्वी चाचण्यांनंतर जेएनपीटीला दोन बोटी

- सर्वसामान्यांसाठी किफायतशीर मॉडेलवर भर

वैशिष्ट्ये -

- लांबी: १३.२७ मीटर

- रुंदी: ३.०५ मीटर

- प्रवासी क्षमता: २४ प्रवासी

- वेग: १४ नॉटिकल माईल्स

- बॅटरी क्षमता: ६४ किलोवॅट (चार तास ऑपरेशन)

- सुविधा: वातानुकूलित, आधुनिक संरचना

युद्धनौकांपासून ई-वॉटर टॅक्सीपर्यंत -

युद्धनौका, क्षेपणास्त्र नौका आणि पाणबुड्यांच्या निर्मितीतील दीर्घ अनुभवाच्या जोरावर माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एमडीएल)ने आता हरित जलवाहतुकीच्या संशोधनाला गती दिली आहे. त्यातूनच १०० टक्के स्वदेशी इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सीची संकल्पना साकारली आहे. तज्ज्ञांच्या मते, मुंबईच्या खडतर पावसाळी समुद्री परिस्थितीत ही प्रणाली यशस्वी ठरल्यास देशातील इतर किनारी भागांसाठीही ती आदर्श ठरू शकते.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.