Gurugram IVF Center Child Swap Case : हरियाणातील गुरुग्राम (Gurugram) मधून वैद्यकीय क्षेत्राला हादरवून सोडणारी आणि आयव्हीएफ (IVF) तंत्रज्ञानाच्या विश्वासार्हतेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी एक अत्यंत गंभीर घटना समोर आली आहे. एका दांपत्यानं गुरुग्राममधील आयव्हीएफ सेंटरवर त्यांचं मूल बदलल्याचा (Child Swapping) खळबळजनक आरोप केला आहे. संशय आल्यानं दांपत्याने मुलाची डीएनए चाचणी (DNA Test) केली असता, जन्माला आलेलं मूल त्यांचं अपत्य नसल्याचं वैद्यकीय अहवालात सिद्ध झालं. या प्रकरणी कोर्टाच्या आदेशानंतर गुन्हा नोंदवण्यात आला, मात्र अवघ्या 24 तासांत पोलिसांनी तपास रोखल्यामुळे पीडित दांपत्यानं आता थेट सोशल मीडियाद्वारे न्यायाची मागणी केली आहे.
राहुल राठोड आणि मीनू राठोड अशी पीडित माता-पित्यांची नावं आहेत. तब्बल 5 ते 6 लाख रुपयांचा खर्च आणि अनेक महिने वेदनादायी उपचारांना सामोरं जाऊनही पदरी फसवणूक आल्यानं या दांपत्यानं आता केंद्रीय यंत्रणांकडे धाव घेतली आहे.
तक्रारदार राहुल राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या आयव्हीएफ उपचारांची प्रक्रिया खालीलप्रमाणे,
13 फेब्रुवारी 2025 : आयव्हीएफ प्रक्रियेसाठी पती-पत्नीचे एग्स (Eggs) आणि सीमेन (Semen) घेण्यात आलं.
14 मे 2025 : लॅबमध्ये तयार झालेला एम्ब्रिओ (Embryo) पत्नीच्या गर्भाशयात ट्रान्सफर करण्यात आला.
5 जानेवारी 2026 : मीनू राठोड यांनी बाळाला जन्म दिला.
बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याचा चेहरा कुटुंबातील कोणत्याही सदस्याशी जुळत नव्हता. त्यामुळे राठोड दांपत्याचा संशय वाढल्याने त्यांनी बाळाची लॅबमधून अधिकृत DNA चाचणी करून घेतली. या चाचणीच्या अंतिम अहवालात (DNA Report Mismatch) हे मूल राहुल किंवा मीनू या दोघांचेही जैविक अपत्य नसल्याचं स्पष्ट झालं. यामुळे 'आमचे स्वतःचे हक्काचे मूल कुठे आहे?' असा आर्त सवाल या दांपत्याने उपस्थित केला आहे.
राहुल राठोड यांनी आरोप केला आहे की, आयव्हीएफ सेंटरमध्ये जाणूनबुजून निष्काळजीपणा करण्यात आला किंवा डिलिव्हरी दरम्यान मुलांची अदलाबदल झाली.
फसवणूक उघडकीस आल्यानंतर हे दांपत्य तीन महिने पोलिसांचे उंबरठे झिजवत होते, मात्र गुन्हा दाखल झाला नाही. अखेर स्थानिक न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर पोलिसांनी गुन्हा तर नोंदवला, पण दुसऱ्याच दिवशी अज्ञात कारणांमुळे या तपासाला स्थगिती देण्यात आली.
राहुल यांच्या दाव्यानुसार, त्यांच्याकडे रुग्णालय प्रशासनासोबत झालेल्या संभाषणाची एक ऑडिओ क्लिप आहे, ज्यामध्ये त्यांचे स्पर्म (Sperm) इतर अनेक महिलांच्या उपचारांसाठी वापरण्यात आल्याचं धक्कादायक विधान रुग्णालय कर्मचाऱ्यानं केलं आहे. हा पुरावा त्यांनी पोलिसांना सोपवला आहे.
सर्व प्रशासकीय पातळ्यांवरून निराशा पदरी आल्यानंतर राहुल आणि मीनू राठोड यांनी आपल्या कुटुंबासह एक व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर शेअर केला आहे, जो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. "हा व्हिडिओ कदाचित त्या दुसऱ्या कुटुंबापर्यंत पोहोचावा, ज्यांच्यासोबत आमचे बाळ बदलले गेले आहे, जेणेकरून दोन्ही कुटुंबांना न्याय मिळेल," अशी भावनिक साद त्यांनी घातली आहे.
न्यायालयाने रुग्णालयाला मीनू यांच्या डिलिव्हरीच्या दिवशी इतर किती महिलांची प्रसूती झाली, याचे रेकॉर्ड सादर करण्याचे आदेश दिले होते, मात्र रुग्णालयाने अद्याप हा डेटा दिलेला नाही. हे प्रकरण दिल्ली-एनसीआर (Delhi-NCR) मधील आयव्हीएफ सेंटर्सच्या व्यावसायिक नीतिमत्तेवर मोठे प्रश्न उभे करत असून, पीडित दांपत्याने आता या संपूर्ण घोटाळ्याची सीबीआय (CBI) चौकशी करण्याची मागणी करत उच्च न्यायालयात (High Court) याचिका दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे.
ही बातमी वाचा :