सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा थरार पाहायला मिळत आहे. इंग्लंडमध्ये वुमन्स टी 20i वर्ल्ड कप स्पर्धा खेळवण्यात येत आहे. या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या 10 व्या पर्वात पहिल्यांदाच 12 संघ सहभागी झाले आहेत. वुमन्स टीम इंडियाने या स्पर्धेत विजयी सलामी दिली आहे. भारतीय पुरुष संघ मायदेशात अफगाणिस्तान विरुद्ध एकदिवसीय मालिका खेळत आहे. तर इंडिया ए टीम श्रीलंका दौऱ्यावर आहे. त्यामुळे चाहत्यांसाठी सध्या पर्वणी आहे. अशात बुधवार 17 जून ही तारीख भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी खास ठरणार आहे. बुधवारी भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात तब्बल 2 सामने खेळवण्यात येणार आहेत. या 2 सामन्यांबाबत जाणून घेऊयात.
तिलक वर्मा याच्या नेतृत्वात इंडिया ए टीम श्रीलंका दौऱ्यावर आहे. श्रीलंका, अफगाणिस्तान आणि टीम इंडिया यांच्यात ट्राय सीरिज खेळवण्यात येत आहे. इंडिया ए विरुद्ध श्रीलंका ए यांच्यातील सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी 10 वाजता सुरुवात होणार आहे.
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील दुसर्या सामन्यात सिनिअर टीम आमनेसामने असणार आहे. टीम इंडिया मायदेशात अफगाणिस्तान विरुद्ध शुबमन गिल याच्या नेतृत्वात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळत आहे. उभयसंघातील ही पहिलीच एकदिवसीय द्विपक्षीय मालिका आहे. टीम इंडियाने या मालिकेत विजयी सलामी दिली आहे. त्यामुळे भारतीय संघ सलग दुसऱ्या विजयासाठी सज्ज आहे. या सामन्याला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.
भारताने सलामीच्या सामन्यात अफगाणिस्तानवर विजय मिळवला होता. पावसाने खोडा घातल्याने हा सामना 50 ऐवजी 25 ओव्हरचा करण्यात आला. भारताने हा सामना 7 विकेट्सने जिंकला.
दरम्यान वुमन्स वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत टीम इंडिया आपल्या मोहिमेतील दुसरा सामना बुधवारी 17 जूनला खेळणार आहे. वुमन्स टीम इंडियासमोर या क्रिकेट सामन्यात नेदरलँड्सचं आव्हान असणार आहे. हरमनप्रीत कौर भारताचं नेतृत्व करणार आहे. टीम इंडिया विरुद्ध नेदरलँड्स सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे. त्यामुळे बुधवारी भारतीय संघ एकूण 3 पैकी किती सामने जिंकण्यात यशस्वी ठरणार? याची प्रतिक्षा चाहत्यांना असणार आहे.