ट्राय नॅशन ए 2026 मालिकेतील चौथ्या सामन्यात श्रीलंका विरुद्ध भारत आमनेसामने होते. हा सामना बरोबरीत सुटल्याने सुपर ओव्हरद्वारे विजेता ठरला आहे. यजमान श्रीलंकेने टीम इंडियावर सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला आहे. भारतीय संघाने श्रीलंकेसमोर मुख्य सामन्यात 265 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र श्रीलंकेलाही 50 ओव्हरमध्ये 265 धावांपर्यंतच पोहचता आलं. त्यामुळे सामना बरोबरीत सुटला. त्यानंतर सुपर ओव्हर खेळवण्यात आली. श्रीलंकेने टीम इंडियासमोर सुपर ओव्हरमध्ये 17 धावांचं आव्हान ठेवलं. मात्र टीम इंडियाला 9 धावाच करता आल्या. श्रीलंकेने अशाप्रकारे सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला. भारताचा हा या मालिकेतील सलग आणि एकूण दुसरा पराभव ठरला.
श्रीलंकेने टॉस जिंकून भारताला फलंदाजीसाठी भाग पाडलं. सूर्यांश शेडगे आणि विपराज निगम या जोडीने केलेल्या अर्धशतकी खेळीमुळे टीम इंडियाला श्रीलंकेसमोर 50 ओव्हरमध्ये सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहचता आलं. भारताने49.2 ओव्हरमध्ये ऑलआऊट 265 धावा केल्या. सूर्यांशने सर्वाधिक 72 धावा केल्या. तर विपराज निगम याने 51 धावांचं योगदान दिलं. मात्र विपराज निगम याने केलेल्या चुकीमुळे भारताला फटका बसला. विपराज खेळपट्टीवरील प्रतिबंधित भागावरुन धावल्याने नियमाचं उल्लंघन झालं. त्यामुळे 10 धावांचा दंड ठोठावण्यात आला. त्याचा फायदा श्रीलंकेला झाला.
श्रीलंकेसाठी सदीरा समरविक्रमा याने 113 बॉलमध्ये 93 रन्स केल्या. सदीरा मैदानात असल्याने श्रीलंका हा सामना सहज जिंकेल असं चित्र होतं. श्रीलंकेला शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त 5 धावांची गरज होती. मात्र अर्शद खान याने चिवट बॉलिंग केली. अर्शदने या दरम्यान सदीराला आऊट केलं. त्यामुळे सामना आणखी रंगतदार स्थितीत पोहचला. श्रीलंकेला विजयासाठी शेवटच्या बॉलवर 2 रन्सची गरज होती. तेव्हा अर्शदने फक्त 1 धाव दिली. त्यामुळे सामना टाय झाला.
सामना बरोबरीत सुटल्याने आता सुपर ओव्हर होणार असं क्रिकेट चाहत्यांना आणि दोन्ही संघांना अपेक्षित होतं. मात्र फिल्ड अंपायर्सची कमी सूर्यप्रकाशामुळे सुपर ओव्हर खेळवण्याची इच्छा नव्हती. मात्र भारतीय कर्णधार तिलक वर्मा पंचाकंडे सुपर ओव्हरसाठी आग्रह करत होता. श्रीलंकेच्या कर्णधाराने सुपर ओव्हरसाठी होकार दिला. त्यानंतर अखेर सुपर ओव्हर होणार असल्याचं निश्चित झालं. भारतासाठी अर्शद खाने यानेच सुपर ओव्हर केली. अर्शदने 16 धावा दिल्या. त्यामुळे भारताला सुपर ओव्हरमध्ये 17 धावांचं आव्हान मिळालं.
भारताकडून सुपर ओव्हर खेळण्यासाठी वैभव सूर्यवंशी आणि सूर्यांश शेडगे हे दोघे खेळायला आले. वैभव फटकेबाजी करण्यात माहिर आहे. त्यामुळे वैभव इथेही त्याची कमाल दाखवेल असं अपेक्षित होतं. मात्र तसं काहीच झालं नाही. सूर्यांश आणि वैभव या दोघांना सुपर ओव्हरमध्ये 9 धावाच करता आल्या. श्रीलंकेने अशाप्रकारे विजय मिळवला.