Maruti WagonR BioFlex Flex Fuel Car: मारुती सुझुकीने भारतातील पहिली फ्लेक्स-फ्यूएल कार, वॅगन आर बायोफ्लेक्स लॉन्च केली. ही कार E85 इंधनावर (85 टक्के इथेनॉल-मिश्रित पेट्रोल) चालेल. या कारची सुरुवातीची किंमत ₹७.२४ लाख असून, ती दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असेल. E85 वॅगन आर ही स्टँडर्ड मॉडेलपेक्षा ₹86 हजारपेक्षा महाग आहे. व्यावसायिक सेगमेंटमध्ये उपलब्ध असलेल्या टूर H3 च्या तुलनेत, तिची किंमत ₹१.३५ लाख ते ₹२.२५ लाख अधिक आहे. वॅगन आर टूर H3 ची किंमत ₹4.99 लाख ते ₹5.89 लाख दरम्यान आहे. सध्या, ही कार केवळ टॅक्सी आणि फ्लीटसारख्या व्यावसायिक सेगमेंटमधील ग्राहकांसाठी उपलब्ध असेल.
कारचे बाह्य डिझाइन नेहमीच्या वॅगन आरसारखेच आहे, परंतु E85 इंधनावर चालण्यासाठी तिच्या इंजिन आणि घटकांमध्ये तांत्रिक बदल करण्यात आले आहेत. कंपनीने अपग्रेड केलेले फ्युएल इंजेक्टर, नवीन फ्युएल पंप, नवीन फ्युएल लाईन्स, रिकॅलिब्रेटेड ECU आणि एक विशेष इथेनॉल सेन्सर बसवले आहेत. फ्लेक्स-फ्युएल वॅगन-आरमध्ये सध्याच्या 1.2 लिटर (1200cc) इंजिनची सुधारित आवृत्ती आहे. कंपनीने अधिकृतपणे कामगिरीची माहिती जाहीर केलेली नाही, परंतु मिळालेल्या माहितीनुसार, हे इंजिन नेहमीच्या पेट्रोल इंजिनपेक्षा किंचित जास्त पॉवर आणि टॉर्क देते. ही कार सध्या 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह उपलब्ध असेल. कंपनीने अद्याप नवीन मॉडेलचे मायलेज जाहीर केलेले नाही. तथापि, अलीकडील इंधन चाचण्यांनुसार, E85 इंधनावर गाडी चालवल्यास इंधन कार्यक्षमतेत 24 टक्के घट होऊ शकते. मॅन्युअल ट्रान्समिशन असलेली स्टँडर्ड पेट्रोल वॅगन-आर 23.56 किमी प्रति लिटर मायलेज देते.
नवीन वॅगन आर फ्लेक्स फ्युएलचे एकूण डिझाइन स्टँडर्ड मॉडेलसारखेच आहे, परंतु त्याला एक वेगळी ओळख देण्यासाठी काही कॉस्मेटिक बदल करण्यात आले आहेत. या विशेष व्हेरिएंटला रेग्युलर मॉडेलपासून वेगळे करण्यासाठी, कंपनीने संपूर्ण बॉडीवर 'फ्लेक्स फ्युएल' ग्राफिक्स जोडले आहेत. टेलगेटवर एक छोटा 'फ्लेक्स फ्युएल' क्रोम बॅज देखील लावण्यात आला आहे.
दुसरीकडे, इथेनॉल मिश्रण 85 टक्के असलेले E85 इंधन दिल्लीत अधिकृतपणे सुरू झाले आहे. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी इंडियन ऑइलच्या (IOC) पुसा रोड आउटलेटवर दिल्लीतील पहिल्या ई85 इंधन वितरण केंद्राचे उद्घाटन केले. विशेष म्हणजे, हे पेट्रोलपेक्षा प्रति लिटर 20 रुपयांनी स्वस्त आहे. दिल्लीत E85 इंधनाची किंमत प्रति लिटर 82.12 रुपये निश्चित करण्यात आली आहे. ही किंमत दिल्लीत विकल्या जाणाऱ्या नियमित E20 पेट्रोलपेक्षा तब्बल 20 रुपयांनी कमी आहे. पेट्रोल पंपांवर ग्राहकांमध्ये कोणताही संभ्रम टाळण्यासाठी, E85 इंधन वितरकांवर विशिष्ट ब्रँडिंग आणि स्पष्टपणे दिसणारे लेबल लावलेले असेल.
इतर महत्वाच्या बातम्या