Karad Airport Issue : कऱ्हाड विमानतळ घेईना 'टेक-ऑफ'! विस्तारीकरणासाठी २२१ कोटी मंजूर होऊनही कार्यवाही संथच
esakal June 16, 2026 02:45 AM

कऱ्हाड - ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील पहिले विमानतळ कऱ्हाडला सुरू झाले. हवाई इमर्जन्सीवेळीही येथील विमानतळाचा वापर केला जातो. विमानतळ प्राधिकरणाच्या नियमानुसार सुरक्षेच्या आवश्यक उपाययोजना येथील विमानतळावर नाहीत. विमानतळाभोवतीच्या उंच इमारतींचाही अडथळा ठरत असून, त्याचा विमान लँडिंगवेळी धोका होऊ शकतो. विस्तारीकरणाची कार्यवाही अंतिम टप्प्यात आली आहे. मात्र, त्याला सध्या गती नाही. त्यामुळे विस्तारीकरणाचे काम रखडल्यातच जमा आहे.

सध्या विमानतळ विस्तारीकरण सुरू आहे. त्यामुळे विमानतळावर मोठी विमाने उतरू शकणार आहेत. मात्र, विमाने उतरताना आणि उड्डाण करताना ज्या सुरक्षेच्या उपाययोजना, यंत्रणा आवश्यक आहे, त्याची मात्र येथील विमानतळावर कमतरता आहे. विमानतळ परिसराच्या सुरक्षेच्या दृष्टीने विमानतळ विकास कंपनीने निर्बंध लागू केले आहेत.

त्यामध्ये कलर कोडिंग नकाशा परिघात उंच बांधकामे करू नयेत, परिसरात उंच झाडे लावण्यावरही निर्बंध लावावे, त्या परिसरातील बांधकामास विमानतळ विकास कंपनी, संबंधित विभागाचा दाखला घेणे बंधनकारक, सुरक्षेच्या दृष्टीने स्थानिक प्रशासनाने असे काही आढळल्यास संबंधितावर योग्य ती कारवाई करावी, अपघाताचा धोका टाळण्यासाठी संबंधित यंत्रणांनी नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, तरीही उंच बांधकामे सुरूच असल्याचा अहवाल विमानतळ विकास कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शासनाकडे पाठवला आहे. मात्र, त्यावर कार्यवाही होताना दिसत नाही. त्यामुळे विमान उतरताना त्याचा धोका संभवू शकतो.

यासाठी आहे विस्ताराची गरज

कऱ्हाडला ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाणांचे समाधिस्थळ, देशातील पहिले भूकंप संशोधन केंद्र, कोयना धरण, एमआयडीसी ही महत्त्वाची ठिकाणे आहेत. त्यामुळे येथील विमानतळाच्या विस्तारीकरणाची गरज माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अधोरेखित केली होती. त्यांनी विमानतळ विस्तारीकरणाची कार्यवाही हाती घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. त्यापासून विमानतळ विस्तारीकरणाची कार्यवाही सुरू आहे. अलीकडेच्या विस्तारीकरणासाठी २२१ कोटींचा निधीही मंजूर झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मध्यंतरी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विस्तारीकरणासह पुढील कार्यवाही मिशन मोडवर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

अनियंत्रित विकासाने धोका

विमानतळ परिसरातील अनियंत्रित विकासामुळे भविष्यात दुर्घटनेचा धोका निर्माण होत आहे. विमान वाहतुकीच्या सुरक्षिततेसाठी ठरवलेल्या नियमांचे काटेकोर पालन न झाल्यास गंभीर परिणाम संभवतात. विशेषतः रात्री किंवा प्रतिकूल हवामानात उंच इमारती विमानचालकांसाठी धोका ठरू शकतात. या पार्श्वभूमीवर, संबंधित यंत्रणांनी संयुक्त पाहणी मोहीम राबवून नियमभंग करणाऱ्या बांधकामांवर त्वरित कारवाई करणे आवश्यक आहे.

अशी आहे स्थिती

  • विस्तारीकरणासाठी एकूण लागणारी जमीन - ४७.८७ हेक्टर

  • एकूण बाधित शेतकऱ्यांची संख्या - एक हजार १९१

  • बाधितांसाठीची निवाडा वाटप रक्कम - ७५ कोटी ६७ लाख

  • वाटप केलेली रक्कम - ५४ कोटी ६३ लाख

  • वाटपाचे शिल्लक राहिलेली रक्कम - २१ कोटी ३ लाख

  • वाटप केलेल्या बाधितांची संख्या - ९५४

  • शिल्लक बाधितांची संख्या - २३७

असे होईल विस्तारीकरण

  • रनवेसाठी मिळणारे क्षेत्र - ४७.२५.२ हेक्टर

  • पोच रस्त्यासाठी मिळणारे क्षेत्र - ०.६२ हेक्टर

  • मध्यापासून दोन्ही बाजूला २१० मीटर वाढेल जमीन

  • धावपट्टीची रुंदी ३० मीटर होईल.

  • धावपट्टीची लांबी १७०० मीटर होईल.

  • विमानतळासाठी नव्याने कलर कोडिंग नकाशा लागू होईल.

...अन्यथा पैसे सरकारकडे जमा

ज्या शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदला सरकारकडून आला आहे. मात्र, ज्यांनी ते पैसे घेतलेले नाहीत, त्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. त्याचबरोबर काही शेतकऱ्यांनी पैसेच घेतलेले नाहीत. संबंधितांनी दिलेल्या मुदतीत पैसे घेतले नाहीत, तर न्यायालयामार्फत सरकारकडे जमा करण्याची कार्यवाही हाती घेण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले.

नाईट लँडिंगची गरज

विमानतळावर नाईट लँडिंगच्या सुविधेसाठी तत्कालीन उद्योगमंत्री पतंगराव कदम यांनी २० वर्षांपूर्वी प्रस्ताव करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर त्याकडे दुर्लक्ष झाले. दरम्यान, सध्या विमानतळ विस्तारासाठी सध्या २२१ कोटींची निधी मंजूर झाला आहे. त्यामध्ये नाईट लँडिंगच्या सुविधेचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यात येथे नाईट लँडिंगची सुविधा होऊ शकते.

असा होईल फायदा

  • कऱ्हाडला मध्यवर्ती विमानतळ कार्यान्वित होईल.

  • दिवसा एटीआर ७२ या प्रकारचे विमान उतरू शकेल.

  • रात्रीचे एटीआर ४२ विमानतळाचे नाईट लँडिंग होऊ शकते.

  • दिवसरात्र विमानतळ सुरू राहणार असल्याने सोय होणार

  • मोठे विमान उतरू शकणार असल्याने प्रवासी वाहतूक वाढू शकते.

या सुविधांची आवश्यकता

  • इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टिम

  • डिस्टन्स मेझरिंग इक्विपमेंट

  • हवाई वाहतूक नियंत्रण कक्ष

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.