ईश्वरपूर/जुनेखेड (जिल्हा सांगली) - कौटुंबिक वाद तसेच आर्थिक देवाणघेवाणीच्या कारणातून वाळवा तालुक्यातील जुनेखेड (जिल्हा सांगली) येथे बाप-लेकाने मिळून कपिल झाजम्या पवार (वय-३५) या सख्ख्या भावाचा विळ्याने सपासप वार करून खून केल्याची खळबळजनक घटना घडली. आज रात्री साडेआठच्या सुमारास राहत्या घरीच हा प्रकार घडला. या घटनेत कपिल जागीच ठार झाला. याप्रकरणी वडील झाजम्या कस्तान्या पवार (वय-६५) व भाऊ अजय झाजम्या पवार (वय-४५) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलीस तसेच घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कपिल पवार, झाजम्या पवार आणि अजय पवार हे जुनेखेडमधील दलित वस्ती शेजारी पुनर्वसनातून मिळालेल्या जमिनीवर उभारलेल्या झोपडीत राहतात. गेली पंधरा वर्षे ते येथे वास्तव्यास आहेत. कपिल विवाहित असून त्याला तीन मुलगे व एक मुलगी अशी चार अपत्ये आहेत. त्यांच्यात कौटुंबिक वाद नेहमीचेच होते.
आज सकाळीही या बाप-लेकांत वाद झाला होता. रात्री झाजम्या आणि अजय हे दोघे दारू पिऊन घरी आले आणि पुन्हा सकाळचा वाद पेटला. आर्थिक देवाणघेवाणीवरून त्यांच्यात वाद सुरू होता. दरम्यान, रागाच्या भरात व दारूच्या नशेत झाजम्या आणि अजय या बाप-लेकांनी मिळून घरातील विळ्याने त्याच्या गळ्यावर व हातावर वार केले. यात कपिलचा मृत्यू झाला.
घटनेची बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली. गावातून साखराळेकडे जाणाऱ्या मधल्या रस्त्याने बाप-लेक पळून जात असताना पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेतले. दरम्यान, या प्रकरणात आई अंजना हिचाही सहभाग असल्याचा संशय पोलिसांना असल्याने तिलाही ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलीस उपअधीक्षक अरुण पाटील आणि पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. फॉरेन्सिक लॅबचे पथकही घटनास्थळी दाखल झाले होते. ग्रामस्थ व परिसरातील लोकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नव्हता.