बार्शीटाकळी (जि. अकोला) : नगरपालिकेच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’ अंतर्गत झालेल्या १० नगरसेवकांच्या शिवसेना प्रवेशामुळे स्थानिक सत्तासमीकरणांमध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ संभाजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेने नगरपालिकेतील आपली संघटनात्मक पकड अधिक मजबूत केल्याचे स्पष्ट होत आहे.
या पक्षप्रवेशासाठी शिवसेनेचे अकोला जिल्हा विशेष प्रभारी ललितभाऊ वानखडे आणि जिल्हाप्रमुख चंद्रशेखर पांडे (गुरुजी) यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या प्रयत्नांमुळे अपक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) अशा विविध राजकीय पार्श्वभूमीतील नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. या घटनेमुळे स्थानिक पातळीवर पक्षनिष्ठेपेक्षा विकासाच्या मुद्द्यावर आधारित राजकीय पुनर्रचना सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.
शिवसेनेत प्रवेश केलेल्या नगरसेवकांमध्ये अपक्ष गटातील शुभम इंगळे, नवेद खान, इफ्तेखारुद्दीन काझी आणि शहाना अंजुम यांचा समावेश आहे. काँग्रेस पक्षातून रफिया खान, मुमताज सिद्दीक, सय्यद जहागीर आणि आसगिरी अंजुम यांनी शिवसेनेत प्रवेश केला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मधील रुबिना परवीन आणि सफिया बेगम यांनीही शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. या सामूहिक प्रवेशामुळे बार्शीटाकळी नगरपालिकेतील सत्तासंतुलनावर थेट परिणाम होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. अपक्ष आणि विरोधी पक्षांतील नगरसेवक मोठ्या प्रमाणात शिवसेनेकडे वळल्याने आगामी नगरपालिकेतील निर्णयप्रक्रिया आणि सत्तास्थापनेच्या गणितात शिवसेना निर्णायक भूमिकेत येण्याची चिन्हे आहेत.
विशेष म्हणजे, या पक्षांतरामागे स्थानिक विकासकामांबाबत असलेली नाराजी, गटबाजीतील तणाव तसेच सत्ताकेंद्राच्या जवळ राहून निधी आणि प्रकल्प मिळवण्याची राजकीय गरज हे घटक कारणीभूत असल्याचे मानले जात आहे. ‘ऑपरेशन टायगर’मुळे शिवसेनेने केवळ संख्याबळ वाढवले नसून विरोधी गटांमध्येही अस्थिरता निर्माण केली आहे.
ललितभाऊ वानखडे यांनी या प्रसंगी बोलताना सांगितले की, शिवसेनेत प्रवेश करणारे सर्व नगरसेवक विकासाच्या दृष्टीकोनातून एकत्र आले आहेत. तर चंद्रशेखर पांडे (गुरुजी) यांनी या घडामोडींमुळे शिवसेनेचे संघटन अधिक मजबूत होईल आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षाची भूमिका निर्णायक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. एकूणच, बार्शीटाकळी नगरपालिकेतील हा सामूहिक पक्षप्रवेश आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणांना नवे वळण देणारा ठरू शकतो, असा कयास राजकीय वर्तुळातून व्यक्त होतोय.