Manoj Jarange Patil : पश्चिम महाराष्‍ट्रातील ४२ लाख मराठ्यांना आरक्षण लाभ मिळेल
esakal June 16, 2026 03:45 AM

कऱ्हाड - सातारा गॅझेटियरसाठीच यावेळचे आंदोलन उन्हात केले. त्यासाठी सरकारने एक महिन्याचा कालावधी मागितला. मात्र, त्यांना दोन महिन्यांचा कालावधी घेण्यास सांगितले असून, त्यानंतर निघणारा मराठा समाजाचा अध्‍यादेश पक्का काढण्यात येणार आहे. त्यामध्ये कसलीही हालचाल करता येणार नाही. त्याद्वारे पश्चिम महाराष्ट्रातील ४२ लाख मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळेल, असा विश्वास मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी आज येथे व्यक्त केला.

कोल्हापूरहून शहापूरकडे (ता. कऱ्हाड) रवाना होण्यापूर्वी श्री. जरांगे-पाटील यांनी येथील दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

कोल्हापूर संस्थानचे गॅझेटियर मागवून घेऊन अहवाल तयार करा, असे मी आताच मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना फोनवरून सांगितले आहे. त्‍यांनीही तत्‍परता दाखवली आहे, असे सांगून जरांगे- पाटील म्‍हणाले, ‘सातारा गॅझेटियर लागू होण्यासाठीच मी मध्यंतरी आंदोलन केले. त्यासाठी ॲडव्होकेट जनरल, तज्ज्ञांशी चर्चा करायची असल्याने सरकारने एक महिन्याचा वेळ मागितला. त्या गॅझेटियरच्‍या १५ लाख नोंदी आहेत. त्यामुळे मी त्यांना दोन महिने घ्या, असे सांगितले आहे; परंतु मराठा समाजाचा अध्यादेश चांगला पक्का निघणार आहे.

या निर्णयामुळे पश्चिम महाराष्ट्रातील ४२ लाख मराठा समाज आरक्षणात जाणार आहे. त्यामुळे घटनेत, कायद्यात त्यांना ते बसवायला लागणार आहे. त्यासाठीची कार्यवाही सध्या सुरू आहे.’ नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, उपनगराध्यक्ष पोपटराव साळुंखे यांच्यासह नगरसेवक, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक, पदाधिकारी, मराठा बांधव-भगिनी यांनी जरांगे-पाटील यांचे स्वागत केले.

मनोज जरांगे-पाटील हे २०२३ मध्ये पहिल्यांदा कऱ्हाडला आले होते. त्यावेळची त्यांची मध्यरात्री झालेली सभा गाजली होती. त्यानंतर तीन वर्षांनी आज जरांगे-पाटील यांचे कोल्हापूरहून कऱ्हाडला आगमन झाले. त्यांचे पाचवड फाटा, आटके टप्पा, जखिणवाडी, कोयना वसाहत, मलकापूर, कोल्हापूर नाका, दत्त चौक, कृष्णा कॅनाॅल आदी ठिकाणी बांधवांच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.