मुलाच्या चितेची राख थंड होण्याआधीच आईचीही जीवनयात्रा संपली; क्रीडाविश्व हळहळलं
किरण महानवर June 16, 2026 06:13 PM

मिळालेल्या माहितीनुसार, 49 वर्षीय जसपाल राणा यांचे 12 जून रोजी आकस्मिक निधन झाले होते. आपल्या एकुलत्या एका मुलाच्या जाण्याने श्यामा देवी यांना मानसिक धक्का बसला होता. तेव्हापासून त्यांची प्रकृती सातत्याने खालावत चालली होती. अखेर मंगळवारी सकाळी दिल्लीतील लष्करी रुग्णालयात त्यांनी अंतिम श्वास घेतला. जसपाल राणा यांचे नातेवाईक दिनेश गौड यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

जसपाल राणा यांचे वडील नारायण सिंह राणा हे माजी क्रीडा मंत्री आहेत. अवघ्या काही दिवसांतच त्यांनी तरुण मुलगा आणि पत्नी दोघांनाही गमावले आहे. या दुहेरी आघातामुळे संपूर्ण कुटुंब, नातेवाईक आणि त्यांचे हितचिंतक तीव्र शोकात बुडाले आहेत.

जसपाल राणा यांची सख्खी बहीण सुषमा राणा या देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या सून आहेत. राजनाथ सिंह यांचे सुपुत्र आणि सुषमा राणा यांचे पती पंकज सिंह हे नोएडाचे आमदार आहेत. या दुःखद प्रसंगी अनेक राजकीय नेत्यांनी आणि क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांनी राणा कुटुंबाचे सांत्वन केले आहे.

भारतीय नेमबाजीचा चेहरा बदलणाऱ्या जसपाल राणा यांचे 12 जून रोजी दिल्लीतील रुग्णालयात निधन झाले होते. जर्मनीहून भारतात परतत असताना विमानातच त्यांची प्रकृती अचानक बिघडली होती. भारतात उतरताच त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतरही त्यांचे प्राण वाचवता आले नाहीत. जसपाल राणा यांच्या इच्छेनुसार त्यांच्यावर 14 जून रोजी वाराणसीच्या मणिकर्णिका घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांची अंतिम यात्रा डेहराडून ते वाराणसी अशी रस्ते, हवाई आणि जलमार्गाने पूर्ण करण्यात आली होती.

जसपाल राणा हे भारतीय नेमबाजीच्या इतिहासातील सर्वात यशस्वी खेळाडूंपैकी एक होते. त्यांच्या नावावर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर 600 हून अधिक पदके आहेत. 1994 मध्ये त्यांनी ज्युनियर वर्ल्ड शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकून जागतिक विक्रम रचला होता. त्यांनी देशातील अनेक युवा नेमबाजांना मार्गदर्शन करून जागतिक दर्जाचे खेळाडू घडवले होते. 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.