भारत इनोव्हेट्स 2026 : दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदार आणि स्टार्टअप्स यांच्यात संवाद, 80 पेक्षा अधिक स्टार्टअप्सचा सहभाग
Tv9 Marathi June 16, 2026 09:45 PM

भारत इनोव्हेट्स 2026 च्या (15 जून 2026) दुसऱ्या दिवशी जागतिक गुंतवणूकदार, उद्योग क्षेत्रातील दिग्गज, संशोधक, धोरणकर्ते, स्टार्टअप्स आणि शैक्षणिक संस्थांमध्ये व्यापक चर्चा आणि सहभाग पाहायला मिळाला. या दिवशी नवकल्पनांना गती देणे, तंत्रज्ञान भागीदारी अधिक मजबूत करणे आणि डीपटेक (DeepTech) उपायांच्या व्यावसायिकीकरणाला चालना देणे यावर विशेष भर देण्यात आला. भारत सरकारचा उपक्रम असलेल्या आणि शिक्षण मंत्रालयाद्वारे राबविण्यात येणाऱ्या भारत इनोव्हेट्स 2026 या परिषदेमुळे भारतातील वेगाने विस्तारत असलेल्या नवोन्मेष परिसंस्थेला जागतिक भांडवल, औद्योगिक कौशल्य, संशोधन नेटवर्क आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांशी जोडणारे एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.

दिवसाची सुरुवात ‘इनोव्हेशन शोकेस’ने झाली. यामध्ये भारतीय स्टार्टअप्स आणि देशातील आघाडीच्या उच्च शिक्षण संस्थांनी विकसित केलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे सादरीकरण करण्यात आले. जैवतंत्रज्ञान, सेमीकंडक्टर, प्रगत उत्पादन, आरोग्यसेवा, ऊर्जा, मोबिलिटी, अंतराळ तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) या क्षेत्रांतील नवकल्पनांनी विशेष लक्ष वेधून घेतले. मुख्य भाषण करताना एशियन पेंट्स लिमिटेडचे सह-प्रवर्तक आणि एंजेल गुंतवणूकदार जलज दानी यांनी वैज्ञानिक नवकल्पनांना बाजारपेठेतील मागणी, औद्योगिक भागीदारी आणि दीर्घकालीन संस्थात्मक उभारणीशी जोडण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

परिषदेत विविध चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये इन्स्टिट्यूट पाश्चरचे प्रा. चेतन चिटणीस, सफ्रान रिओस्कच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ऑरेलि गिरू, थेल्स अलेनिया स्पेसचे बर्ट्रांड डेनिस, GIFAS चे मुख्य कार्यकारी अधिकारी फ्रेडरिक पॅरिसो, सोनी इनोव्हेशन फंडच्या योको फुकाता आणि मिजुहो फायनान्शियल ग्रुपचे सुनील बक्षी यांसारख्या आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी सहभाग घेतला.

या चर्चांमध्ये जैव-नवोन्मेष, प्रगत उत्पादन, अंतराळ, संरक्षण पुरवठा साखळी आणि जागतिक गुंतवणूक यांसारख्या विषयांवर चर्चा झाली. संशोधनातून व्यावसायिक स्तरापर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक असलेले ‘पेशंट कॅपिटल’, आंतरराष्ट्रीय सह-विकास आणि मजबूत यंत्रणा उभारण्यावर विशेष भर देण्यात आला. दुसऱ्या दिवसाचा महत्त्वाचा भाग म्हणजे गुंतवणूकदार आणि स्टार्टअप्स यांच्यातील व्यापक संवाद कार्यक्रम. भारत इनोव्हेट्सशी संलग्न 80 हून अधिक डीपटेक स्टार्टअप्सनी आपल्या नवकल्पनांचे सादरीकरण केले. या सादरीकरणांचे मूल्यांकन 10 हून अधिक देशांतील 50 पेक्षा अधिक जागतिक गुंतवणूकदारांनी केले.

हे पिचिंग सत्र सहा प्रमुख विषयांमध्ये विभागण्यात आले होते
  • अंतराळ आणि संरक्षण
  • कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सेमीकंडक्टर
  • आरोग्यसेवा आणि मेडटेक
  • जैवतंत्रज्ञान आणि अ‍ॅग्रीटेक
  • ऊर्जा आणि हवामान तंत्रज्ञान
  • प्रगत उत्पादन

या सत्रांमुळे स्टार्टअप्सना जागतिक व्हेंचर फंड आणि कॉर्पोरेट व्हेंचर कॅपिटल संस्थांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाली. यापैकी 40 हून अधिक स्टार्टअप्सना गुंतवणूकदारांकडून पुढील चर्चेसाठी निश्चित प्रतिसाद मिळाला असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीची शक्यता निर्माण झाली आहे. परिषदेत पहिल्या दिवशी जाहीर झालेल्या सुमारे 30 दशलक्ष अमेरिकी डॉलरच्या गुंतवणूक उपक्रमांचाही विशेष उल्लेख करण्यात आला.

दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस भारत इनोव्हेट्स 2026 ने खालील महत्त्वपूर्ण टप्पे गाठले
  • भारत इनोव्हेट्समधील नवोन्मेषकांसोबत 1,350 हून अधिक B2B बैठका आयोजित
  • 50 पेक्षा अधिक सहकार्य करार (Collaboration Agreements)
  • 10 हून अधिक देशांतील 50 पेक्षा जास्त जागतिक गुंतवणूकदारांसमोर 80 हून अधिक स्टार्टअप्सची सादरीकरणे
  • 40 पेक्षा अधिक स्टार्टअप्सना गुंतवणूकदारांकडून पुढील चर्चेसाठी निश्चित प्रतिसाद
  • भारत इनोव्हेट्समधील नवोन्मेषकांशी संबंधित अंदाजे 254.5 दशलक्ष अमेरिकी डॉलरच्या निधी व प्रगत गुंतवणुकीच्या घोषणा

गुंतवणूकदारांशी थेट संवाद, तंत्रज्ञान प्रदर्शन आणि सीमापार सहकार्याच्या व्यासपीठांमुळे भारत इनोव्हेट्स 2026 ने भारताची डीपटेक नवकल्पनांच्या जागतिक केंद्र म्हणून ओळख अधिक मजबूत केली आहे. तसेच भारत, युरोप आणि इतर आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमधील सहकार्याचे नवे मार्ग खुले केले आहेत. दुसऱ्या दिवसातील व्यापक सहभाग आणि परिणामकारक चर्चांमुळे भारत इनोव्हेट्स 2026 ही परिषद जागतिक तंत्रज्ञान भागीदारी, डीपटेक गुंतवणूक आणि नवकल्पना-आधारित आर्थिक विकासाला चालना देणारा एक प्रभावी मंच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले.

परिषदेच्या अंतिम दिवशी तंत्रज्ञान उद्याने (Technology Parks), अ‍ॅक्सेलरेटर्स, हवामान तंत्रज्ञान, औद्योगिक डीकार्बोनायझेशन, जागतिक विस्तार धोरणे आणि दीर्घकालीन संस्थात्मक भागीदारी यांसारख्या विषयांवर चर्चा होणार असून, या माध्यमातून परिषदेत निर्माण झालेल्या नवोन्मेषी संबंधांना अधिक बळकटी देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.