पावसानं दिली ओढ, बळीराजाचे डोळे आभाळाकडं! दुष्काळ पडणार नाही, पंजाबराव डखांनी पावसाबाबत दिली महत्वाची माहिती 
एबीपी माझा वेब टीम June 17, 2026 12:13 AM

Maharashtra Rain Punjabrao Dakh News : राज्यात पावसाळ्याचा हंगाम सुरु झाला आहे, तरीदेखील पाऊस पडत नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळं राज्यातील शेतकरी चिंतेत आहे. शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहे. पावसावाचून शेतकऱ्यांची पिकं जळू लागली आहेत. अशातच हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिलासादायक माहिती दिली आहे. महाराष्ट्रात यंदा दुष्काळ पडणार नाही. याउलट यंदाचं वर्ष हे शेतकऱ्यांसाठी सर्वात चांगलं राहणार असल्याची माहिती पंजाबराव डखांनी दिली आहे.  

दरम्यान, प्रशांत महासागरात सुरु असलेल्या वातावरणातील बदलांमुळे राज्यात पाऊस पडण्यास उशीर होत आहे. त्याबरोबर राज्य आणि देशातील मान्सूनवर यंदा अल-निनोचं संकट आहे. या संकटामुळे राज्यावर दुष्काळाचे देखील सावट आहे. राज्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाच्या शास्त्रज्ञांकडून यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे. यामुळे राज्यातील शेतकरी चिंतेत आहेत. पेरण्या केल्या आणि पाऊस पडला नाही तर शेतीचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. सध्या शेतकऱ्यांना पावसाची मोठी गरज आहे. शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत. ज्या शेतकऱ्यांची पिके आता शेतात उभी आहेत ती वाया जाण्याची भिती निर्माण झाली आहे. 

जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस येणार, डखांचा अंदाज

दरम्यान, एका बाजूला पाऊस पडत नसताना दुसऱ्या बाजूला पंजाबराव डखांनी दिलासा देणारी माहिती दिली आहे.   हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी यंदा भरपूर पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. शेतकऱ्यांनी घाबरुन जाण्याची गरज नाही. या जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस येणार आहे . शेतकऱ्यांच्या पेरण्या सुरु होणार आहेत. तसेच काही जणांच्या तरीही पेरण्या राहिल्या तरी 10 जुलै ते 15 जुलैच्या काळातही तुफान पाऊस येईल. तेव्हाही पेरण्या करता येतील. पण दुष्काळ वगैरे पडणार नाही असी माहिजी डखांनी दिली आहे. 
दरम्यान, महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला आहे. पण दाखल झाल्यानंतर तो स्थिरावला. पण वारा सुटण्याची ही परिस्थिती पाऊस पडल्यानंतर पुढच्या महिन्यात असते. यावर्षी ही परिस्थिती आधी आल्यामुळे शेतकऱ्याला असं वाटतंय की, यावर्षी पाऊस पडणार नाही.पण यावर्षी देखील चांगला पाऊस पडणार असल्याचे डख म्हणाले. 

El Nino Update : दुष्काळाचं सावट, 'एल निनो'मुळे यंदा कुठे कमी तर कुठे जास्त पाऊस होणार, भारतीय हवामान विभागाचा इशारा, पूर्वानुभव काय सांगतो?

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.