पाबळ - जिद्द, कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि कुटुंबीयांच्या पाठबळाच्या जोरावर पाबळ (थापेवाडी ता. शिरूर) येथील देवेंद्र गणपत गव्हाणे याने शासकीय सरळसेवा परीक्षेत यश मिळवत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यकारी सहायक पदाला गवसणी घातली. या यशामुळे परिसरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
थापेवाडी आणि पाबळ येथे प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर वडिलांच्या नोकरीनिमित्त देवेंद्रचे कुटुंब मुंबईतील डोंबिवली येथे स्थायिक झाले. तेथे त्याने माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. पुढे दापोली कृषी विद्यापीठातून पदवीचे शिक्षण घेत असतानाच शासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न त्याने उराशी बाळगले.
शासकीय सेवेत कार्यरत असलेले वडील, कुटुंबीयांचे प्रोत्साहन तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून कार्यरत असलेले मोठे बंधू निळकंठ गव्हाणे यांच्याकडून मिळालेली प्रेरणा हीच यशाची खरी ताकद ठरल्याचे देवेंद्र सांगतो. सरळसेवा परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाल्यानंतर त्याची बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यकारी सहायक पदावर निवड झाली.
माझ्या शिक्षणाच्या प्रवासात आई-वडील आणि संपूर्ण कुटुंबीयांनी मोलाची साथ दिली. मोठे बंधू निळकंठ गव्हाणे वनपरिक्षेत्र अधिकारी झाल्याने त्यांच्याकडून प्रेरणा मिळाली. कार्यकारी सहायक पदावर निवड झाली असली, तरी पुढे केंद्रीय लोकसेवा आयोग आणि राज्य लोकसेवा आयोग परीक्षांची तयारी करणार आहे.
- देवेंद्र गव्हाणे, कार्यकारी सहायक, बृहन्मुंबई महानगरपालिका