Competitive Exams : गारकोलवाडीचा सागर शिंदे दोन स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी
esakal June 17, 2026 03:45 AM

पाबळ - दुष्काळी परिस्थिती, आर्थिक हालअपेष्टा, आईचे अकाली निधन आणि प्रतिकूल परिस्थितीची मालिका... या सर्व संकटांवर जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या बळावर मात करीत कान्हूर मेसाई (ता. शिरूर) येथील गारकोलवाडीच्या सागर सखाराम शिंदे याने स्पर्धा परीक्षेत यश संपादन केले.

अवघ्या दोन दिवसांच्या अंतराने लागलेल्या दोन स्वतंत्र परीक्षांच्या निकालात त्याची महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) निम्न श्रेणी लघुलेखक (वर्ग- २) तसेच समाजकल्याण विभागात लघुटंकलेखक (स्टेनोग्राफर) पदासाठी निवड झाली.

सागरचे वडील सखाराम शिंदे आणि आई शालन यांनी मजुरी करीत तीन मुलांचे शिक्षण पूर्ण केले. सागरचे प्राथमिक शिक्षण गारकोलवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत, माध्यमिक शिक्षण मलठण येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये, तर उच्च माध्यमिक शिक्षण कान्हूर मेसाई येथील विद्याधाम विद्यालयात झाले. तर, शिरूर शहरातील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ केंद्रातून पदवीपर्यंतचे शिक्षण त्याने पूर्ण केले.

सागर पदवीच्या अंतिम वर्षात असतानाच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. अल्पशा आजाराने त्याच्या आईचे दुर्दैवी निधन झाले. या घटनेने संपूर्ण कुटुंब हादरले; मात्र वडिलांनी खंबीरपणे सर्व जबाबदाऱ्या सांभाळत मुलांना आधार दिला. आईच्या स्वप्नांची पूर्तता करण्याचा निर्धार मनाशी बाळगत सागरने स्पर्धा परीक्षांच्या तयारीत स्वतःला झोकून दिले. अखेर त्याच्या परिश्रमांना यश मिळाले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.