ढिंग टांग : इत्थेनाल, तित्थेनाल...सड्डे नाल!
esakal June 17, 2026 10:45 AM

‘सड्डे नाल रहोगे तो ऐश करोगे, जिंदगी के सारे मजे कॅश करोगे...’ या सुमधुर आणि मनात एक अनाहत नाद निर्माण करणाऱ्या स्वरगंधर्व दलेरसाहेब मेहंदी यांच्या बहारदार गीताचे स्वर आम्ही सहजपणे गुणगुणत असतानाच इथेनालच्या शंभर टक्के वापराला परवानगी देण्याबाबतच्या फाइलवर माननीय गडकरीसाहेबांनी स्वाक्षरी केली. तो दिवस सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा, असा होता. सरासरी साताठ ॲव्हरेज देणाऱ्या गाडीने अनपेक्षितरीत्या हायवेवर बावीसचे ॲव्हरेज दिल्यावर बसेल असा तो धक्का होता.

आपल्या देशाच्या भविष्याला खऱ्या अर्थाने स्टार्टर मारणारा हा अलौकिक क्षण होता, असे आम्ही म्हणू! बारा वर्षांचा तपकाळ सफळ झाला असेच आम्ही म्हणू!!

गेले दशकभर गडकरीसाहेब ‘इथेनॉल वापरा रे, वापरा रे इथेनॉल, अरे, वापराना इथेनॉल...’ असे पोटतिडिकीने सांगत आले आहेत. पोटतिडकीने म्हंजे अक्षरशः पोट तिडकीने! या तिडकीपायी कित्येक प्रांठे, भजी, भेळी, वडे यांची आहुती पडावी लागली. वेळीच ऐकले असते तर आज होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे बटाटेवड्यांचे गाडे बंद पडले नसते. ग्यास सिलिंडरसाठी वणवण भटकावे लागले नसते. पेट्रोल पंपांवरील रांगा लावाव्या लागल्या नसत्या.

‘‘मी तं पहिल्यापास्नंच सांगत होतो की बाबांनो, इथेनॉल वापरा, पेट्रोलचं काही खरं नाही, पण कुणी ऐकूनच नाही ऱ्हायलं. मग म्हटलं मरा!’’ साहेबांनी साबुदाणा वड्याची ऑर्डर प्लेस करता करता माहिती दिली. आम्हाला हुरुप आला...

‘परवाच रात्री आठ वाजता मी दिली सही ठोकून! म्हटलं, जाव, इथेनॉलच वापरा आता!’’ साबुदाणेवडे येईपर्यंत पोहे मागवण्याचा धोरणी विचार मनाशी घोळवत साहेब म्हणाले. आम्हाला आणखी हुरुप आला...

भविष्यात मोटारी इथेनॉलवर धावणार, आणि ऊस, मका, तांदळापासून इथेनॉल उत्पादन करणारे शेतकरी अरबी झगे घालून टेचात फिरणार, ऐसे चित्र आमच्या मनीं तरळून गेले. ऊस इज ए न्यू ऑइल, मका इज द न्यू डेटा...असे अर्थतज्ज्ञांच्या लेखांचे मथळे आम्हाला दिसू लागले. गडकरीसाहेबांबद्दल आम्हाला आधीच अतीव आदर आहे, तो दुणावला.

‘‘काय व्हीजन आहे तुमचं, साहेब! इथेनॉलची जादू तुम्हाला समजली कशी?’’ आम्ही एक डोळा मुदपाकखान्याकडे ठेवून विचारले.

‘‘अबे, इथेनॉल ही संजीवनी आहे, संजीवनी! मी तर म्हणतो, तुमचे ते वडेबिडे इथेनॉलमध्ये तळा! भेळीवर गोड चटणी म्हणून इथेनॉल शिंपडा, बघा काय लज्जत येते.. अबे, भैताडा, पोहे आण नं पट्टदिशी, जा नंऽऽ..,’’ साहेबांचे शेवटले वाक्य चाकराला उद्देशून होते, आम्ही उगीचच कार्बुरेटरमध्ये कचरा अडकल्यासारखे आचकलो!!

गाड्यांचे इंधन सोडा, पण इथेनॉलच्या कढईत भजी सोडता येतात, हे आम्ही पहिल्यांदाच ऐकत होतो. इथेनॉलने झुरळे मरतात का, असे आम्ही विचारणार होतो. पण साबुदाणा वडा येईपर्यंत तरी हा प्रश्न नकोच, असे आम्ही धोरणीपणाने ठरवले.

‘‘हे पहा, आज काय होर्मुझ बंद, उद्या काय, सुवेझ कालवा बंद, परवा काय तेलविहिरीच बंद...असं किती दिवस चालणार? काखेत इथेनॉलचा कळसा असताना, होर्मुझला वळसा काहून घालायचा? आता चालवा, वाट्टेल तेवढ्या गाड्या!’’ साहेबांनी शेवटी न राहवून प्यांटीच्या खिश्यातली शेंगदाण्याची पुडी काढलीच. पोहे, पोहे!!

‘‘साहेब, तुस्सी ग्रेट हो! इथेनॉल क्रांतीचे तुम्ही जनक आहात!’’ आम्ही.

‘‘दोन प्लेट साबुदाणे वडे जास्त आणा रे!’’ साहेबांनी खुशीने ऑर्डर वाढवली.

‘‘तेवढं ते गोवा हायवेचं मार्गी लागलं तर-’’ आम्ही चुकून बोलून गेलो, आणि घात झाला! पुढले काही म्हणता काही आठवत नाही. म्हणतात ना, नजर हटी, दुर्घटना घटी!

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.