सलग दुसऱ्यांदा फिफा विश्वचषक जिंकण्याच्या हेतूने मैदानात उतरलेल्या लिओनेल मेस्सीने स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात आपल्या इराद्यांची झलक दाखवून दिली. अल्जेरियाच्या बचावफळीला भेदत त्याने केवळ एक किंवा दोन नव्हे, तर हॅट्ट्रीक साधली. आपल्या २०० व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळताना, मेस्सीने १७ व्या मिनिटाला पहिला गोल केला आणि ७६ व्या मिनिटाला तिसरा गोल करत आपली हॅट्ट्रिक पूर्ण केली. अर्जेंटिनाने अल्जेरियाचा ३-० असा दणदणीत पराभव केला.
विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात मेस्सीने आपल्या चाहत्यांना अविस्मरणीय खेळाची मेजवानी दिली. वय ३८ वर्षे असूनही, त्याची ऊर्जा आणि तंदुरुस्ती एखाद्या २८ वर्षीय खेळाडूला लाजवणारी होती. त्याने एकट्याने संपूर्ण अल्जेरियन संघावर वर्चस्व गाजवले. १७ व्या मिनिटाला त्याने गोलकीपरला चकवून चेंडू जाळीत धाडला. जो त्याचा १४ वा विश्वचषक गोल ठरला.
पहिल्या सत्राच्या अखेरीस अर्जेंटिनाकडे १-० अशी आघाडी होती. पहिल्या ४५ मिनिटांत अल्जेरियाने बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना यश आले नाही. दुसऱ्या सत्रातही मेस्सीचे वर्चस्व कायम राहिले. ६० व्या मिनिटाला त्याने आपला दुसरा गोल केला आणि स्पर्धेतील आपली एकूण गोलसंख्या १५ वर नेली. अल्जेरियन गोलकीपर लुका झिदानला चेंडूवर नियंत्रण मिळवण्यात अपयश आल्यानंतर मिळालेल्या ‘रिबाउंड’वर त्याने हा गोल केला.
दोन गोल केल्यानंतर, मेस्सीने ७६ व्या मिनिटाला पुन्हा गोल करत आपली हॅट्ट्रिक पूर्ण केली आणि अर्जेंटिनाचा विजय निश्चित केला. हा त्याचा १६ वा विश्वचषक गोल होता, ज्याद्वारे त्याने जर्मनीचा दिग्गज स्ट्रायकर मिरोस्लाव क्लोस याच्या विक्रमाशी बरोबरी केली. त्याच्या शानदार कामगिरीसाठी त्याला ‘प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार’ मिळाला. आता, पुढील सामन्यात मेस्सीला हा विक्रम मोडीत काढण्याची आणि विश्वचषकाच्या इतिहासात आणखी एक सुवर्ण अध्याय लिहिण्याची संधी आहे.