सतत थकवा येणे, चक्कर येणे, अशक्तपणा जाणवणे किंवा कामात लक्ष न लागणे ही शरीरातील रक्ताच्या कमतरतेची लक्षणे असू शकतात. वैद्यकीय भाषेत याला ॲनिमिया असे म्हणतात. रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण योग्य राहण्यासाठी लोह, व्हिटामिन बी 12 आणि फॉलिक अॅसिडयुक्त आहार घेणे आवश्यक आहे.
हिरव्या पालेभाज्या
पालक आणि मेथी यांसारख्या हिरव्या पालेभाज्यांमध्ये लोहाचे प्रमाण भरपूर असते. या भाज्यांचे नियमित सेवन केल्यास शरीरातील हिमोग्लोबीन वाढण्यास मदत मिळू शकते. त्यामुळे रक्तनिर्मितीची प्रक्रिया अधिक प्रभावी होते.
फळे
डाळिंब, सफरचंद आणि बीट ही फळे रक्तातील लाल पेशी वाढवण्यासाठी उपयुक्त मानली जातात. या पदार्थांमध्ये शरीराला आवश्यक पोषक घटक असतात जे रक्ताची कमतरता दूर करण्यास मदत करतात.
सुकी फळे
खजूर, मनुका, बदाम, अंजीर आणि जर्दाळू यामध्ये लोहाचे प्रमाण चांगले असते. हे पदार्थ रोजच्या आहारात समाविष्ट केल्यास शरीराला नैसर्गिकरित्या लोह मिळते आणि हिमोग्लोबीनची पातळी सुधारण्यास मदत होते.
कडधान्ये
मोड आलेली मटकी, चणे आणि इतर कडधान्यांमध्ये भरपूर प्रमाणात लोह असते. नियमितपणे कडधान्यांचे सेवन केल्यास रक्ताची कमतरता भरून काढण्यास मदत होऊ शकते.
गूळ शेंगदाणे
गुळामध्ये नैसर्गिक लोह असते. गूळ आणि शेंगदाणे एकत्र खाल्ल्यास शरीरात लोहाचे शोषण अधिक चांगल्या प्रकारे होते. त्यामुळे रक्तवाढीसाठी हा पारंपरिक उपाय आजही प्रभावी मानला जातो.
व्हिटामिन सीयुक्त फळे
फक्त लोहयुक्त पदार्थ खाणे पुरेसे नसते. ते शरीरात योग्य प्रकारे शोषले जाणेही गरजेचे असते. यासाठी लिंबू, संत्री आणि आवळा यांसारख्या व्हिटामिन सीयुक्त फळांचे सेवन करणे फायदेशीर ठरते.
चहा आणि कॉफी टाळा
जेवणानंतर लगेच चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असल्यास ती टाळणे आवश्यक आहे. कारण यामुळे शरीरातील लोहाचे शोषण कमी होऊ शकते आणि रक्तवाढीच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होऊ शकतो.
निरोगी सवयी
पुरेशी झोप, नियमित व्यायाम आणि संतुलित आहार यामुळे रक्ताभिसरण सुधारते. जर रक्ताची कमतरता गंभीर स्वरूपाची असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लोहाच्या गोळ्या घेणे आवश्यक ठरू शकते.
रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण योग्य ठेवण्यासाठी लोहयुक्त पदार्थांसोबत व्हिटामिन सीयुक्त फळे, कडधान्ये आणि सुकामेवा यांचा समावेश असलेला संतुलित आहार आवश्यक आहे. योग्य जीवनशैली आणि पोषक आहारामुळे रक्ताची कमतरता दूर करून शरीर अधिक निरोगी ठेवता येऊ शकते.