Sangli आमच्या जीवाला धोका, बंदुकीचा परवाना द्या; ३५ हजार अर्ज, कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न
esakal June 17, 2026 06:45 PM

सांगली : 'पोलिस आमची सुरक्षा करू शकत नसतील, तर आम्हालाच आमची सुरक्षा करू द्या. त्यासाठी आम्हाला शस्त्र परवाना द्या,' अशी मागणी करणारे तब्बल ३५ हजार अर्ज आज जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल करण्यात आले. भयमुक्त, नशामुक्त सांगली अभियानांतर्गत नागरिकांनी हे अर्ज भरले होते. तानाजी सावंत आणि सतीश साखळकर यांनी हे अर्ज जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केले.

Deool Band 2: ‘देऊळ बंद-२’ ची कमाई आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी; प्रवीण तरडे-कैलास वाणी, साईबाबांच्या शिर्डीत संकल्प जाहीर


जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडल्याचा आरोप करत एकामागोमाग होत असलेले खून, वाढत्या चोऱ्या-घरफोड्या आणि नशिल्या पदार्थाची राजरोस विक्री याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले. अमली पदार्थांच्या वाढत्या गैरव्यवहारामुळे गुन्हेगारी वाढत असून, खून, दहशत निर्माण करणे, अमली पदार्थांची विक्री तसेच विविध अवैध धंदे हे आता सामान्य होत चालल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

ही वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी जिल्हा दंडाधिकारी म्हणून तातडीने लक्ष घालून प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली. तसेच जिल्हा पोलिस प्रशासन राजकीय दबाव किंवा वैयक्तिक स्वार्थापोटी आपल्या कर्तव्यात कसूर करीत असून, गंभीर परिस्थितीत बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोपही करण्यात आला. पोलिस प्रशासनाला योग्य त्या सूचना देऊन कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी, अशी मागणी करण्यात आली.

सांगलीत नागरिकांना रस्त्यावर सुरक्षितपणे फिरणे कठीण झाले असेल, तर कायदा व सुव्यवस्था कुठे आहे, असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला. जनतेचा उद्रेक होण्याची वाट पाहू नका, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला.

Success Story: जुन्नरच्या सिद्धीने गाठले आकाश! अवघ्या २०व्या वर्षी अमेरिकेतून कमर्शियल पायलट बनण्याचा मान, सिद्धी हाडवळेची प्रेरणादायी यशोगाथा..

तानाजी सावंत म्हणाले, "जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी आमची बाजू ऐकून घेतली असून सकारात्मक भूमिका घेतली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर योग्य ती पावले उचलली जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच पोलिस प्रशासन, महसूल विभाग आणि अन्न व औषध प्रशासन यांची संयुक्त बैठक घेण्याचेही ठरले आहे." यावेळी शंभूराज काटकर, कुलदीप देवकुळे, रोहित कबाडे, रविंद्र वळवडे, बटू करडे, रोहित घुबडे, अमित पाटील, स्वप्निल शिंदे, कुमार सावंत, सुजित पवार, अमर औरादे, सागर कोळेकर आदी उपस्थित होते.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.