आईला ड्युटीवर सोडण्याची तयारी, चक्कर येऊन धाडकन घरासमोर कोसळला.. प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा जन्मदात्रीसमोरच अंत !
Tv9 Marathi June 18, 2026 12:45 PM

Karnataka News : ज्याला 9 महिने पोटात वाढवलं, कष्ट करून मोठं केलं, त्याच अपत्याचा आपल्या डोळ्यांसमोर मृत्यू होण, यापेक्षा भयानक गोष्ट आई-वडिलांसाठी असू शकत नाही. पुत्रवियोगाचं हे दु:ख कोणालाच सहन होण्यासारखं नाही. मात्र कर्नाटकच्या दावणगेरे येथे अशीच एक अत्यंत हृदयदरावक आणि हादरवणारी घटना घडली आहे. तेथील केटीजे (KTJ) नगर येथे राहणाऱ्या सुशील कुमार या अवघ्या 26 वर्षीय नामांकित राष्ट्रीय-स्तरीय बॉडीबिल्डरचा हृदयविकाराच्या झटक्याने अचानक मृत्यू झाला. राज्यात आणि देशभरातही शेकडो पुरस्कार जिंकून दावणगेरेचे नाव उंचावणाऱ्या या होतकरू खेळाडूच्या अकस्मात निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. सर्वात दुःखद बाब म्हणजे, या तरुण मुलाचा मृत्यू त्याच्या आई-वडिलांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला.

कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशील कुमारने नेहमीप्रमाणे सकाळी जिममध्ये आपला नियमित व्यायाम पूर्ण केला होता आणि संध्याकाळी पुन्हा तिथे जाण्याची त्याची तयारीही झाली होती. मात्र, आपल्या आईला तिच्या ड्युटीसाठी ‘दावणगेरे जिल्हा रुग्णालयात’ सोडायला तो घराबाहेर पडणार होता, इतक्यातच त्याला अचानक चक्कर आली. अन् तो धाडकन घरासमोरच कोसळला. नातेवाईक, शेजाऱ्यापाजाऱ्यांच्या मदतीने तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र त्याचा रक्तदाब अत्यंत कमी असल्याचं डॉक्टरांना तिथे आढळलं; दुर्दैवाने उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याचं निधन झालं.

आईसमोरच झाला लाडक्या लेकाचा मृत्यू

विख्यात बॉडीबिल्डर सुशील कुमारचे त्याच्या आईवर नितांत प्रेम होतं; त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरील तिचे शेकडो व्हिडिओ त्या दोघांच्या प्रेमाची साक्ष देतात. ज्या आईने आपल्या लाडक्या मुलाचं प्रेमाने संगोपन केलं आणि जी स्वतः रुग्णालयात लोकांचे प्राण वाचवण्याचे काम करते, तिलाच अत्यंत असहायतेने आपल्या तरुण मुलाला अखेरचा श्वास घेताना पाहावं लागलं. या हृदयद्रावक प्रसंगामुळे ती प्रचंड धक्क्यात आहे आणि संपूर्ण कुटुंबावर तर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.

शिस्त आणि साधेपणाचा आदर्श होता सुशील

सुशील कुमार केवळ एक उत्कृष्ट बॉडीबिल्डर नव्हता तर तो त्याच्या शिस्तप्रिय जीवनशैलीसाठीही ओळखला जायचा. मित्र आणि कुटुंबीयांच्या सांगण्यानुसार, सुशीलला कोणतीही वाईट सवय किंवा व्यसन नव्हतं. तो दिवसातून दोनदा कठोर सराव करायटा आणि प्रशिक्षणासाठी त्याच्याकडे येणाऱ्या तरुणांमध्ये नेहमीच शिस्तीचं महत्व पटवून द्यायचा. त्याने अनेक राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये दावणगेरेचे प्रतिनिधित्व केलं आणि शेकडो पदकं जिंकली.

तरूणांमध्ये हार्ट अटॅकची वाढती प्रकरणं चिंताजनक

अलीकडच्या काळात, तंदुरुस्त आणि निरोगी दिसणाऱ्या तरुणांमध्ये अचानक चक्कर येऊन पडणे आणि हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होणं अशा घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. काही काळापूर्वीच जगलूर येथे एका 9 वर्षीय शाळकरी विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची बातमी समोर आली होती. तर आता, सुशील कुमारसारख्या पूर्णपणे निरोगी आणि शिस्तप्रिय खेळाडूच्या अचानक मृत्यूने डॉक्टर आणि तज्ज्ञही चिंतेत आहेत. त्याच्या अकस्मात मृत्यूनंतर संपूर्ण क्रीडा जगतात आणि स्थानिक परिसरात शोककळा पसरली आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.