Shivsena : पुढचा पिक्चर लवकर क्लिअर होईल, शिंदेंच्या मुंबईतील आमदाराचं सूचक वक्तव्य
Tv9 Marathi June 18, 2026 07:45 PM

ऑपरेशन टायगर यशस्वी झालं आहे. उद्धव ठाकरे गटाच्या 9 खासदारांपैकी 6 खासदार फुटून बाहेर पडले आहेत. हे खासदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करणार असं बोललं जातय. या सहा खासदारांचा स्वतंत्र गट स्थापन होऊ शकतो. आज उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने व्हीप जारी करुन या खासदारांना बैठकीला बोलावलं होतं. पण हे सहाही खासदार अनुपस्थित राहिले. त्यामुळे ठाकरे गटात फूट पडल्याचं स्पष्ट झालं आहे. शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. “अभी ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है.. आगे आगे देखो होता है क्या.आताही ठाकरे गटातील नगरसेवक आणि आमदार फुटू शकतात. शिंदे साहेबांना हलक्यात घेतले होते…पुढचा पिक्चर लवकर क्लिअर होईल” असं प्रकाश सुर्वे म्हणाले.

प्रकाश सुर्वे मुंबईतील मागाठाणेचे आमदार आहेत. 2022 साली एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे 40 आमदार बाहेर पडले त्यात प्रकाश सुर्वेही होते. ठाकरे गटातील खासदारांच्या फुटीनंतर आमदारही नाराज असल्याची चर्चा आहे. मुंबई महापालिकेतील नगरसेवक फुटण्याची सुद्धा शक्यता व्यक्त केली जात आहे. खासदारांची फूट उद्धव ठाकरेंसाठी मोठा राजकीय धक्का आहे. चार वर्षात दुसऱ्यांदा उद्धव ठाकरे गटात फूट पडली आहे. उद्या या खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला, तर NDA मध्ये त्यांचं राजकीय बळ वाढणार आहे.

ओढा भाजप आणि एकनाथ शिंदे शिवसेनेकडे

आज दिवसभरात तीन वेळा संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. एकनाथ शिंदे, भाजप यांच्यावर टीका केली. खासदार फुटून बाहेर पडल्याने निश्चित पक्षात अस्वस्थतता, चलबिचल वाढणार आहे. मागच्या चार वर्षात खासकरुन विधानसभा निवडणूक निकालानंतर उद्धव ठाकरे गटातून मोठ्या प्रमाणात आऊट गोईंग झाल आहे. निघणारे पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा ओढा भाजप आणि एकनाथ शिंदे शिवसेना यांच्याकडे आहे. शिवसेना शिंदे गटाची ताकद दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

संजय देशमुखांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेचा ठाकरे गट जिल्ह्यात आक्रमक

यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांनी बंडखोरी केल्याने यवतमाळ जिल्ह्यातील ठाकरे सेनेकडून जाहीर निषेध सभेचे आयोजन करण्यात आले आहे. निवडणुकीच्या वेळेस उद्धव साहेबांना सांगितलं होतं की हा भविष्यात हरामखोरी करणार. पण सेनेच्या काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना हाताशी पकडून ठाकरे गटाची तिकीट मिळवून खासदारकी मिळविली असं ठाकरे गटाच्या जिल्हा महिला प्रमुख सगरताई पुरी यांनी सांगितलं.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.