शोध लग्नाळू मुलींचा : १०० लग्नाळू मुलांमागे केवळ ६० मुली
Marathi June 18, 2026 09:25 PM

एकेकाळी ‘चांगला मुलगा मिळणे’ हीच वधूपित्यांची सर्वात मोठी चिंता मानली जात होती. मुलीच्या विवाहासाठी योग्य स्थळाच्या शोधात नातेवाईक, परिचित, मध्यस्थ आणि वधू-वर सूचक मंडळांचे उंबरठे झिजवले जात. कुठे एखादा सुशिक्षित, सुसंस्कृत आणि स्थिरस्थावर मुलगा मिळतो का, यासाठी अनेक कुटुंबांची धावपळ सुरू असे. मात्र, काळाच्या ओघात या चित्राने अनपेक्षित कलाटणी घेतली आहे. आता अनेक समाजांमध्ये ‘मुलाला अनुरूप मुलगी मिळणे’ हेच कुटुंबांसमोरचे मोठे आव्हान बनले आहे. ‘आपलं महानगर’ने नाशिक शहरातील संख्येने मोठ्या असलेल्या काही समाजांच्या वधू-वर सूचक मंडळांतील नोंदणीचा अभ्यास केला असता या बदलत्या वास्तवाचे धक्कादायक चित्र समोर आले. या मंडळांनुसार, विवाहासाठी नोंदणी करणाऱ्या सरासरी १०० मुलांमागे केवळ ६० मुलींची नोंद होत आहे. परिणामी, विवाहेच्छूक तरुणांची संख्या मुलींच्या तुलनेत लक्षणीयरीत्या अधिक असल्याचे स्पष्ट होत आहे.

विवाहासाठी नोंदणी करणाऱ्या मुलांची संख्या मुलींपेक्षा लक्षणीयरीत्या अधिक

मुलांची प्रतीक्षा यादी वर्षागणिक वाढत असून, अनेक तरुणांची नावे दीर्घकाळ मंडळांच्या यादीत कायम

अनुरूप स्थळांच्या शोधासाठी मुलांच्या पालकांना वारंवार मंडळांशी संपर्क साधावा लागतो

वधू-वर परिचय मेळाव्यांमध्ये मुलींचा सहभाग कमी

एका मुलीच्या स्थळासाठी अनेक मुलांकडून चौकशी होत असल्याने स्पर्धा वाढल्याचे चित्र

मुलांच्या तुलनेत उपलब्ध मुलींची संख्या कमी असल्यामुळे स्थळ जुळण्याचा कालावधी वाढला

अनेक समाजांत मुलांच्या पालकांची धावपळ अधिक

काही वर्षांपूर्वीपर्यंत मुलींच्या पालकांकडून स्थळांच्या शोधासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न होत असत. नातेवाईकांचे जाळे, समाजातील ओळखी, मध्यस्थांची मदत, परिचय मेळावे आणि वधू-वर सूचक मंडळे यांचा आधार घेत योग्य मुलाचा शोध सुरू असे. आज मात्र अनेक समाजांमध्ये हेच चित्र उलटताना दिसत आहे. आता विवाहयोग्य मुलांच्या पालकांकडून वधू-वर सूचक मंडळांशी सातत्याने संपर्क ठेवला जात असल्याचे दिसून येते. नवीन नोंदणी झाली का, कोणती स्थळे उपलब्ध आहेत, परिचय मेळावे कधी आहेत, अद्ययावत यादी मिळू शकेल का, यासाठी त्यांची धावपळ वाढली आहे. महत्त्वाचे म्हणजे, विवाहासाठी नावनोंदणी करणाऱ्या मुलांची संख्या सातत्याने वाढत असताना त्या प्रमाणात मुलींची नोंद होत नसल्याचे निरीक्षण समोर आले आहे. त्यामुळे अनेक तरुणांची नावे मंडळांच्या यादीत वर्षानुवर्षे कायम राहत असल्याचे दिसते.
काही तरुणांची स्थळे पाहण्याची प्रक्रिया अनेक टप्प्यांपर्यंत पोहोचते; चर्चा, भेटीगाठी व प्राथमिक पसंतीनंतरही ती अंतिम निर्णयापर्यंत पोहोचत नाही. परिणामी, मुलींच्या तुलनेत मुलांची प्रतीक्षा यादी मोठी होत असून, अनुरूप स्थळाच्या शोधात अनेक कुटुंबांना अपेक्षेपेक्षा अधिक काळ थांबावे लागत आहे. वधू-वर परिचय मेळाव्यांमध्ये मुलांच्या तुलनेत मुलींचा सहभाग कमी असल्याने अनेक पालकांना अपेक्षित संख्येने स्थळांची माहिती मिळत नाही.

निवडक समाजांत मुलींची नोंदणी अधिक

विवाहाच्या बदलत्या वास्तवाचे चित्र सर्वच समाजांमध्ये एकसारखे नाही. काही समाजांमध्ये विवाहेच्छूक मुलांची संख्या मुलींपेक्षा अधिक असल्याचे दिसत असताना, बौद्ध आणि सुतार समाजासारख्या काही समुदायांमध्ये मात्र याच्या नेमके उलट चित्र समोर येत आहे. बौद्ध समाजाच्या हाय प्रोफाईल बुद्धिस्‍ट मॅट्रोमनी या संस्थेच्या नोंदीनुसार, संस्थेकडे विवाहासाठी ६०० मुलींनी नावनोंदणी केली असून, त्या तुलनेत मुलांची संख्या अवघी ४०० आहे. तर, सुतार समाजाच्या विश्वकर्मा मंदिर ट्रस्‍ट संस्‍थेच्या नोंदींमध्ये १२०० मुलांमागे ७०० मुलींची नोंद आढळून येते. तज्ज्ञांच्या निरीक्षणानुसार, या समाजांमध्ये गेल्या काही वर्षांत मुलींच्या शिक्षणाचा आलेख झपाट्याने उंचावला आहे. मात्र, त्याच वेगाने मुलांच्या शैक्षणिक प्रगतीचा आलेख वाढलेला दिसत नाही. परिणामी, उच्चशिक्षित, आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आणि स्वतःच्या क्षमतांवर उभ्या तरुणींना त्यांच्या शैक्षणिक, वैचारिक आणि व्यावसायिक स्तराशी सुसंगत वर मिळणे दूरापास्त झाले आहे.

‘आपलं महानगर’कडे व्यक्त व्हा !

‘मुलगा आहे; पण अनुरुप स्थळ नाही!’….विवाह संस्थेच्या उंबरठ्यावर उभे असलेले हे बदलते वास्तव म्हणजे समाजाच्या भवितव्याशी निगडित असलेला गंभीर प्रश्न आहे. एका बाजूला अनुरूप वधूच्या शोधात भटकणारे लग्नाळू तरुण तर, दुसऱ्या बाजूला काही समाजांत पूर्वीप्रमाणेच मुलींच्या संख्येचे असलेले असमतोल वास्तव… या सगळ्याचा वेध घेणारी ‘शोध लग्नाळू मुलींचा’ ही विशेष वृत्तमालिका ‘आपलं महानगर’ आजपासून प्रसिद्ध करत आहे. या मालिकेत समस्येची व्याप्ती, तिची कारणे, त्यातून निर्माण होणारे सामाजिक परिणाम, उपाययोजनांच्या शक्यता आणि विविध समाजातील जाणकारांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आपल्याकडे यासंदर्भात अनुभव, निरीक्षण, मत किंवा मांडणी असल्यास ती आम्हाला ९९७५५४७६१६ या व्हॉट्सॲप क्रमांकावर अवश्य पाठवा. कृपया या क्रमांकावर कॉल करू नये; केवळ व्हॉट्सॲप संदेशाद्वारेच आपली प्रतिक्रिया नोंदवावी.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.