'खोक्यांनी पैसे घेऊन गद्दारी करणाऱ्यांना जनतेच्या पैशातून Y+ सुरक्षा..' फुटीरांच्या सुरक्षेवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांचा सडकून प्रहार, सोशल मीडियातही टीकेचा आसूड
जयदीप मेढे June 18, 2026 10:43 PM

Shivsena UBT Crisis: शिवसेना ठाकरे गटाला एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा खिंडार पाडताना सहा खासदार फोडले आहेत. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीमधील नेत्यांसह सोशल मीडियातही या फुटीरांविरोधात संतापाची लाट पसरली आहे. हा विश्वासघात नव्हे, तर थेट मतदारांशी केलेली गद्दारी असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. भरीत भर म्हणजे या फुटीर सहा खासदारांना थेट वाय प्लस सुरक्षा देण्यात आल्याने आणखी उद्रेक झाला आहे. आमदार रोहित पवार, खासदार वर्षा गायकवाड यांनी हल्लाबोल केला आहे. सरकार खोक्यांनी पैसे घेऊन गद्दारी करणाऱ्यांना मात्र जनतेच्या पैशातून Y+ सुरक्षा देतंय,  अशा शब्दात रोहित पवार यांनी तोफ डागली आहे. दुसरीकडे, वर्षा गायकवाड यांनी गद्दारी करणाऱ्यांच्या संरक्षणाचं बिल जनतेनेच का भरावं? अशी विचारणा केली आहे.

सोडणारं हे उलट्या काळजाचं निर्दयी आणि लबाडांचं सरकार

रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, वाह रे सरकार तेरा खेल, किसानों को लगा दिया तेल और गद्दारों को बाँट रहा है झालमुरी भेल! शेतकऱ्यांचं कर्ज माफ करताना जास्त पैसे खर्च होऊ नये म्हणून अटीशर्ती लावणारं सरकार खोक्यांनी पैसे घेऊन गद्दारी करणाऱ्यांना मात्र जनतेच्या पैशातून Y+ सुरक्षा देतंय. यातून सरकारला नेमका कोणता संदेश द्यायचाय? गद्दारी करणाऱ्यांना संरक्षण देऊन पोसणारं आणि महिला सुरक्षा, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी या जनतेच्या प्रश्नांना वाऱ्यावर सोडणारं हे उलट्या काळजाचं निर्दयी आणि लबाडांचं सरकार आहे..!

गद्दारांच्या सुरक्षेचा खर्चही जनतेच्या खिशातूनच केला जाणार 

दरम्यान, वर्षा गायकवाड यांनी मतदारांचा विश्वासघात करा, पक्षाशी गद्दारी करा, सत्तेसाठी भूमिका बदला आणि मग वाय प्लस सुरक्षेच्या कवचात फिरा! जनतेने ज्यांना एका विचारासाठी, एका पक्षासाठी आणि एका भूमिकेसाठी निवडून दिलं, त्यांनीच सत्तेच्या मोहापायी त्या जनादेशाशी बेईमानी केली. आता प्रश्न असा आहे की, अचानक या गद्दारांना एवढ्या कडक सुरक्षेची गरज का भासू लागली? जनतेत जाऊन डोळ्यात डोळे घालून उत्तर देण्याची हिंमत त्यांच्यात उरलेली नाही का? सर्वात संतापजनक बाब म्हणजे, या गद्दारांच्या सुरक्षेचा खर्चही जनतेच्या खिशातूनच केला जाणार आहे. ज्यांनी जनतेचा विश्वास तोडला, जनादेशाशी गद्दारी केली, त्यांच्यासाठी पोलीस यंत्रणा, मनुष्यबळ आणि कोट्यवधी रुपयांचा खर्च सामान्य करदात्यांनी का उचलावा? गद्दारी करणाऱ्यांच्या संरक्षणाचं बिल जनतेनेच का भरावं? ईडी, सीबीआय आणि पैशांच्या जोरावर विरोधी पक्ष कमकुवत करण्याचा हा प्रयत्न आहे. भाजप सरकार लोकशाहीचं नाही, तर गद्दारीचं संरक्षण करत आहे. आज परिस्थिती अशी झाली आहे की, जनादेशाशी बेईमानी करा, सत्ता मिळवा आणि बक्षीस म्हणून वाय प्लस सुरक्षा घ्या! हे अत्यंत दुर्दैवी आहे. कितीही दडपशाही झाली तरी, आम्ही थांबणार नाही. लोकशाही, जनादेश आणि भारतीय संविधानाच्या रक्षणाची लढाई यापुढे अधिक आक्रमकपणे आणि अधिक ताकदीने लढत राहू!

इतर महत्वाच्या बातम्या

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.