Vegetable Rate Hike : पावसाचे आगमन लांबले; भाजीपाला महागला! आवक ४० टक्क्यांनी घटली; मेथी, भेंडी, पालक, वांगीही तेजीत
esakal June 18, 2026 09:45 PM

जळगाव - पावसास होत असलेला विलंब, त्यात उन्हाचा तडाखा सुरू आहे. पावसाने आणखी ओढ दिल्यास भाज्या खरेदीसाठी ग्राहकांना खिसा आणखी सैल करावा लागेल. टोमॅटो, शेवग्याच्या शेंगा, सिमला मिरची, भेंडी ८० रुपये किलोने विकली जात आहे. पावसाने ओढ दिल्याने दिवसेंदिवस भाववाढ होत आहे.

भाज्यांची आवक ४० टक्क्यांनी कमी झाली आहे. उन्हामुळे भाज्या खराब होत आहेत. पावसाने ताण दिल्यानेही उत्पादनावर परिणाम होत आहे. जिल्ह्यातील पालेभाज्यांची आवक कमी झाली. पाउस पडला तरी अजून दोन तीन महिने अशीच परिस्थिती राहणार आहे. सारे काही पावसावर अवलंबून आहे, असे जाणकारांनी सांगितले.

भाज्या खरेदीत आखडता हात

फळभाज्या महागल्याने सध्या कांदा व बटाट्याला मागणी वाढली आहे. परिणामी, महिनाभरापूर्वी १५ रुपये किलोने विक्री होणारा कांदा आता २० -२५ रुपये, तर बटाटा २५ ते ३० रुपये किलोने विकला जात आहे, असे विक्रेते गणेश भावसार सांगितले. भाजीपाल्याच्या वाढत्या किमतीमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. पूर्वीपेक्षा अधिक खर्च भाजीपाल्यावर होत असल्याने अनेक कुटुंबांनी महाग झालेल्या भाज्यांचे प्रमाण कमी केले असून तुलनेने स्वस्त पर्यायांकडे वळण्यास सुरुवात केली आहे.

लग्नसराईत आणखी भाववाढीची शक्यता

पावसाने दगा दिला तर येणाऱ्या लग्नसराईत मागणी वाढून भाज्यांचे दर आणखी महाग होतील. कारण, आता शेतातील विहिरीतही पाणी कमी झाले आहे. उन्हामुळे पालेभाज्या खराब होत असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. बाजारातील कमी आवक, लांबलेला पाऊस आणि वाहतूक खर्च वाढल्याने भाज्यांच्या किमती वाढल्या आहेत. विशेषतः पावसाळ्याच्या सुरुवातीच्या काळात भाजीपाल्याच्या पुरवठ्यावर परिणाम होत असल्याने दरांमध्ये चढ-उतार होत आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.