Pune Fraud News : पर्यटन व्यावसायिकाकडून महिलेची दोन लाखांची फसवणूक; टूरला येणाऱ्या सदस्याचा मृत्यू झाल्याचे सांगत सहल केली रद्द
esakal June 19, 2026 01:45 AM

पुणे - समाज माध्यमावर दुबई टुरच्या पॅकेजची जाहिरात पाहून पर्यटनासाठी पैसे भरलेल्या एका कुटुंबाची दोन लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. टूर कंपनीने पर्यटनाला जाणाऱ्या ग्रुपमधील एका सदस्याचे निधन झाल्याचे सांगत टूर रद्द केली आणि त्यासाठी भरलेले पूर्ण पैसे परत केले नाही.

या प्रकरणी टूर व्यावसायिक शिवाजी तानाजी पवार (रा. मुरारजी पेठ, सोलापूर) यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हडपसर येथील एका महिलेने याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी, त्याचे पती आणि नातेवाइकांना बाहेरच्या देशात पर्यटनाला जायचे होते. त्याचवेळी त्यांनी पवार याच्या स्टेटसवर दुबई टुरच्या पॅकेजची जाहिरात पाहिली. पवार याची छत्रपती पर्यटन नावाने टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्सची कंपनी आहे.

फिर्यादी यांनी स्वतः, पती, आई आणि मावशी असे चौघांचे मिळून चार लाख १५ हजार रुपये ऑनलाईन पद्धतीने पवारकडे भरले. पवार याने फिर्यादी यांना २८ फेब्रुवारीला तुमची दुबई टूर असल्याचे सांगितले होते. मात्र त्याने २७ फेब्रुवारीला फिर्यादी यांना फोन करून सहलीला येणाऱ्या एका सदस्याचे निधन झाल्याचे कारण सांगून टूर रद्द केली.

दरम्यान काळात अमेरिका व इराण युध्द सुरू झाल्यामुळे दुबई येथील हवाई क्षेत्र अनिश्चित काळासाठी प्रवासी विमानासाठी बंद करण्यात आली होती. त्यामुळे फिर्यादी यांनी पवारकडे पैशांची मागणी केली असता त्याने दोन लाख १० हजार रुपये परत दिले, मात्र राहिलेली रक्कम त्यास मागितली असता त्याने वेगवेगळी कारणे सांगून उडवाउडवीची उत्तरे दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी यांनी तक्रार दाखल केली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक विनायक गुरव करत आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.