खुटबाव - वीर (ता. पुरंदर) येथील पार्थ समगीर याने कोणत्याही खासगी क्लासशिवाय स्वअभ्यासाच्या जोरावर ‘संयुक्त सेवा परीक्षेत’ (CDS) यश प्राप्त करीत भारतीय लष्करात लेफ्टनंटपद पटकावले आहे. पहिल्याच प्रयत्नात त्याने हे यश पटकविले असून, तो लवकरच डेहराडून येथे प्रशिक्षणासाठी रवाना होणार आहे.
पार्थचे प्राथमिक शिक्षण पुण्यात झाले असून, त्याने एनसीसीमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना रजतपदकही पटकाविले होते. एनडीएच्या परीक्षेत अपयश आल्यानंतरही खचून न जाता, त्याने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करत सीडीएस परीक्षेचा सराव सुरू ठेवला. विशेष म्हणजे, कुटुंबात २० सदस्य शिक्षक असताना, कोणतीही लष्करी पार्श्वभूमी नसताना पार्थने ही वेगळी वाट निवडली. त्याचे वडील अमोल व आई मीनाक्षी समगीर पुण्यात शिक्षक आहेत.
एकाच वेळी दोन अधिकार पदांची संधी
पार्थची लेफ्टनंट पदावर निवड झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत त्याची भारतीय वायुसेनेत ‘फ्लाईंग ऑफिसर’ म्हणूनही निवड झाली. मात्र, त्याने लष्करातील लेफ्टनंट पदाला प्राधान्य दिले आहे.
लहानपणापासूनच देशसेवेचे स्वप्न होते. जिद्द आणि सातत्यपूर्ण अभ्यासामुळे हे यश मिळाले. भविष्यात सशस्त्र सेवेद्वारे देशाची सेवा करून गावाचे नाव उज्ज्वल करेन.
- पार्थ समगीर