Police Recruitment : संसार सांभाळत साकारले 'खाकी'चे स्वप्न; रेश्मा कारंडे, सोनाली मोटे यांचे यश
esakal June 19, 2026 03:45 AM

सोमेश्वरनगर - ‘मुलांच्या भवितव्यासाठी आणि स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी आम्ही लग्नानंतरही शिकत राहिलो. संसारातील जबाबदाऱ्या पेलत पोलिस भरतीचा अभ्यास केला. पहाटे उठून मैदानी सराव केला आणि अभ्यासासाठी रात्रीचा दिवस केला. प्रदीर्घ संघर्षानंतर अखेर खाकी वर्दी मिळवलीच...’ अशा शब्दात रेश्मा कारंडे-सोडमिसे आणि सोनाली मोटे-ठोंबरे यांनी आपला संघर्षमय प्रवास मांडला.

सदोबाचीवाडी (ता. बारामती) येथील रेश्मा कारंडे आणि जेऊर (ता. पुरंदर) येथील सोनाली मोटे या माऊलींनी आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी पोलिस भरतीचा मार्ग निवडला. करंजेपूलच्या विवेकानंद अभ्यासिकेत अभ्यास केला आणि अनेक तरुणींना मागे टाकत मुंबई पोलिसांत भरती झाल्या.

दहावीत चांगले गुण मिळाले आणि रेश्मा यांचे लग्न झाले. संसार पेलत मराठीची पदवी घेतली. घरी अर्धा एकर शेती आणि मोजक्या गाईंचा गोठा. दोन मुलांच्या भविष्याची चिंता सतावत असताना नणंदेने पोलिस भरतीचा सल्ला दिला. कुटुंबाची साथ मिळाल्याने पहाटेला मैदानावर जायचे, घरी जाऊन धारा काढायच्या, मुलांच्या शाळेचे पहायचे आणि अभ्यासाला लागायचे हा दिनक्रम झाला. २०२५ ची पोलिस भरती थोडक्यात हुकली. अखेर, आताच्या मुंबई पोलिस भरतीत १२१ गुण मिळवून निवडल्या गेल्या.

दहावीत ८८ टक्के आणि बारावीला ६५ टक्के असे उत्तम गुण असलेल्या सोनाली मोटे लग्नानंतर स्वस्थ बसल्या नाहीत. काकडे महाविद्यालयात वाणिज्यची पदवी करीत पोलिस भरतीचा अभ्यास सुरू केला. याच दरम्यान कोरोना काळात त्यांना मूल झाले. मुलगा बालवाडीत जाऊ लागल्यावर पुन्हा पोलिस भरतीचा अभ्यास सुरू केला आणि कुटुंबाच्या साथीने १२५ गुण मिळवत खाकी वर्दी पटकावली. या दोघींनाही गणेश सावंत, महेश काळे, अंकुश दोडमिसे, सतीश करे, दिनेश म्हस्के यांनी मार्गदर्शन केले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.