पुणे - जुलै महिन्यात पुणे शहर आणि धरण क्षेत्रात चांगल्या पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी केले आहे.
पाण्याच्या नियोजनाचा सविस्तर आढावा घेण्यासाठी पालिका आयुक्तांनी आज शिवाजीनगर येथील भारतीय हवामान विभागाच्या कार्यालयाला भेट दिली. तेथे त्यांनी हवामान शास्त्रज्ञांसोबत पावसाच्या संभाव्य अंदाजाबाबत सविस्तर चर्चा केली. जुलै महिन्यात दमदार पाऊस होणार असल्याने नागरिकांनी भयभीत होऊ नये, असे सांगतानाच आयुक्तांनी पाणी जपून व काटकसरीने वापरण्याचे आवाहन केले आहे.
महापालिकेच्या नियमांनुसारच पाण्याचा वापर करावा
पाण्याचा अपव्यय किंवा गैरवापर केल्यास कठोर दंडात्मक कारवाईसह थेट कायदेशीर गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा त्यांनी दिला. या बैठकीला अतिरिक्त पालिका आयुक्त प्राजित नायर, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी गणेश सोनुने यांच्यासह हवामान विभागाचे विभागीय प्रमुख साई कृष्णन व इतर ज्येष्ठ शास्त्रज्ञ उपस्थित होते.