पाऊस पडेचना… शाळांसाठी प्रशासनाने घेतला मोठा निर्णय; आता जोपर्यंत… नेमकं काय ठरलं?
Tv9 Marathi June 19, 2026 09:45 PM

जून महिना संपत आला तरी अजून पावसाचं काही आगमन झालेलं नाही. शिवाय पाऊस नेमका कधी येणार याचाही नेमका अंदाज अद्याप आलेला नाही. पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांपासून सर्वसमान्य लोक चिंतातूर झाले आहेत. त्यातच उकाड्याने प्रत्येकाला हैराण केलं आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत उन्हाचे प्रचंड चटके बसत आहेत. अंगाची लाहीलाही होत आहे. रायगड जिल्ह्यात तर उष्ण आणि दमट हवामानाने लोक हैराण झाले आहेत. अनेकजण आजारी पडत आहे. त्यामुळे आता रायगड जिल्ह्यातील शाळांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. उष्ण आणि दमट हवामानामुळे रायगडातील शाळांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. 19 जून ते 30 जून दरम्यान अंगणवाडी, प्राथमिक तसेच माध्यमिक शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

रायगड जिल्ह्यात अद्याप मान्सूनचे आगमन झाले नसून उष्णता आणि आर्द्रतेचे प्रमाण वाढले आहे. भारतीय हवामान विभागाने उष्ण आणि दमट हवामानासह दुपारनंतर हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तसेच गडगडाटाची शक्यता व्यक्त करत यलो अलर्ट जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष किशन जावळे यांनी महत्त्वाचा आदेश जारी केला आहे. त्यानुसार रायगड जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, प्राथमिक आणि माध्यमिक शाळा 19 जून ते 30 जून 2026 या कालावधीत दुपारच्या सत्राऐवजी सकाळच्या सत्रात भरविण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आदेशात देण्यात आली आहे.

रिसॉर्ट, हॉटेलचे पाणी बंद

दरम्यान, पाऊस लांबल्याने रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्याने पाणी काटकसरीने वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत. रिसॉर्ट, हॉटेल आणि जलतरण तलावाचे पाणी बंद करण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्याने काढले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात फक्त शहराला 25 दिवस पुरेल एवढा पाणीसाठा आहे. पाऊस लांबल्याने सध्यस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांकडून पाण्याचे नियोजन करण्यात येत आहे. विंधन विहिरी आणि नळाच्या पाण्याचा वापर काटकसरीने करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

एल निनोच्या प्रादुर्भावामुळे मान्सूनचे आगमन लांबले

दरम्यान, हवामान खात्याने अंदाज वर्तविल्यानुसार यंदा राज्यात सर्वत्र एल निनोच्या प्रभावामुळे मान्सून लांबला आहे. मान्सूनचा पाऊस न पडल्याने या पावसावर अवलंबून असलेले खरीप हंगामाच्या पेरणीची कामे खोळंबली असल्याने शेतकरी चिंतेत आहे. ग्रामीण भागातील बाजारपेठा ह्या बऱ्यापैकी शेतकऱ्यांवर अवलंबून असतात. त्यामुळे बी – बियाणे मुबलक प्रमाणात खरेदी करून ठेवलेल्या कृषी सेवा केंद्राकडेही शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. एरव्ही जून महिना उजाडला की बी -बियाणे आणि रासायनिक खते खरेदीसाठी शेतकऱ्यांची कृषी सेवा केंद्रात लगबग सुरू होऊन मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. यंदा मात्र कृषी सेवा केंद्रासह बाजार पेठेत शुकशुकाट पाहायला मिळत आहे.

पेरण्या खोळंबल्या…

जूनचा अर्धा महिना ओलांडला तरी अजूनही पावसाने दमदार हजेरी लावलेली नाही. पावसाअभावी पेरण्या खोळंबल्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. वेळेवर पेरणीला उशीर होत असल्याने शेतकऱ्यांनी मका, तूर, मूग, बाजरी बियाणे पाऊस पडेल या आशेवर बाजारातून बियाणेसह खते खरेदी करून आणून ठेवले आहे. परंतु पेरणी योग्य पाऊसच नसल्याने ही बियाणे घरातच पडून आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.