Vaibhav Sooryavanshi : फॉर्मेट बदलताच कामगिरीवर परिणाम, वैभवसमोर कमबॅक करण्याचं आव्हान
GH News June 20, 2026 01:11 AM

आयपीएल स्पर्धेत युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. वैभव आपल्या विस्फोटक बॅटिंगच्या जोरावर आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला. वैभवच्या या कामगिरीनेच बीसीसीआय निवड समितीला त्याला भारतीय संघात स्थान देण्यास भाग पाडलं. निवड समितीने 6 जून रोजी आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यातील टी 20I मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. वैभवचा या दोन्ही संघात समावेश करण्यात आला. वैभव त्याआधी श्रीलंका दौऱ्यात इंडिया ए कडून खेळत आहे. मात्र वैभवला या स्पर्धेत आतापर्यंत चांगलाच संघर्ष करावा लागल्याचं चित्र आहे.

वैभवने कमी वयात दिग्गज गोलंदाजांची धुलाई करुन सर्वांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं. तर आताही चाहत्यांचं लक्ष वैभवकडेच आहे. आयपीएल स्पर्धेत सहजासहजी अर्धशतक करणाऱ्या वैभवला श्रीलंका दौऱ्यात फॉर्मेट बदलल्याने 4 सामन्यांत एकही अर्धशतक करता आलेलं नाही. त्यामुळे वैभवला धावांसाठी झगडावं लागत आहे.

वैभवने आयपीएल स्पर्धेत पहिल्याच बॉलपासून ते आऊट होईपर्यंत फटकेबाजी केली. वैभवने क्वचित अपवाद वगळता सर्वच गोलंदांजाची सारखीच धुलाई केली. त्यामुळे वैभव आयपीएल स्पर्धेनंतर श्रीलंका दौऱ्यात कशी कामगिरी करतो याची चाहत्यांना प्रतिक्षा होती. मात्र फॉर्मेट बदलताच वैभवचा संघर्ष सुरु झालाय. प्रत्येक खेळाडूला पडत्या काळाचा सामना करावा लागतो. वैभवची सध्या वाईट किंवा संघर्षाची वेळ सुरुय का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

वैभव सूर्यवंशीची श्रीलंका दौऱ्यातील कामगिरी

श्रीलंकेत ट्राय नॅशन ए सीरिज खेळवण्यात येत आहे. या मालिकेतून अफगाणिस्तानचा ए संघाचं पॅकअप झालंय. तर अंतिम सामन्यात भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात अंतिम सामन्याचा थरार रंगणार आहे. साखळी फेरीत प्रत्येक संघाने 4 सामने खेळले आहेत. वैभवने अफगाणिस्तान आणि श्रीलंकेविरुद्ध प्रत्येकी 2-2 असे एकूण 4 सामने खेळलेत. वैभवचे या 4 सामन्यांमधील आकडे हे समाधनकारक आहेत. मात्र वैभवच्या बॅटिंगला ते आकडे शोभा देणारे नाहीत.

वैभव मोठी खेळी करण्यात अपयशी

वैभवला या मालिकेतील चारही सामन्यात चांगली सुरुवात मिळाली. मात्र वैभव या खेळीला मोठ्या आकड्यात बदलण्यात अपयशी ठरलाय हे सिद्ध झालंय. वैभवने या मालिकेतील 4 सामन्यांत 14,44, 21 आणि 38 अशा मिळून एकूण 117 धावा केल्या आहेत.

वैभवने 9 जूनला श्रीलंका ए विरुद्ध 14 धावा केल्या. वैभवने 2 दिवसांनंतर 11 जूनला अफगाणिस्तान विरुद्ध 44 धावा ठोकल्या. वैभवने या खेळीसह ट्रेलर दाखवला. त्यामुळे वैभव आगामी सामन्यात मोठी खेळी करेल असं चाहत्यांना वाटलं होतं. मात्र तसं झालं नाही. वैभव श्रीलंकेविरुद्ध 15 जूनला 21 धावा करुन आऊट झाला. तर अफगाणिस्तान विरुद्ध वैभवने साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात 28 चेंडूत 38 धावा केल्या. वैभवने या खेळीत 4 चौकार आणि 2 षटकार लगावले. वैभवला या सामन्यातही मोठी खेळी करण्याची संधी होती. मात्र वैभव पुन्हा अपयशी ठरला. वैभवला या 4 सामन्यात मनसोक्त फटकेबाजी करता आली नाही की फॉर्मेट बदलल्याने त्याला ते अशक्य झालंय? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

परिस्थितीनुसार प्रत्येकाला बदलावं लागतं. हेच सूत्र क्रिकेटपटूंनाही लागू होतं. फॉर्मेटनुसार खेळावं लागतं. वैभव टी 20 क्रिकेटमध्ये अचूक खेळतोय. मात्र वैभवला टी 20 मधून वनडे क्रिकेटमध्ये खेळताना गिअर बदलण्यात अडचणी येत आहेत. वैभव गरजेपेक्षा स्वत:मध्ये बदल करण्याचा प्रयत्न तर करत नाहीय ना? असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. कोणत्याही खेळाडूचा नैसर्गिक खेळ हा त्याची जमेची बाजू असते. मात्र वैभवला आयपीएलप्रमाणे या मालिकेत खेळता आलेलं नाही हे मात्र निश्चित आहे.

वैभव वनडेत बॅकफुटवर!

वैभव आयपीएल स्पर्धेत फ्रँट फुटवर होता. वैभव पाहिजे तेव्हा आणि हवा तसा फटका मारत होता. मात्र आता श्रीलंका दौऱ्यात वैभववर फटकेबाजीवर बंधनं आल्याचं त्याच्या खेळीतून दिसत आहे. वैभव वनडे क्रिकेटमध्ये फॉर्मेटनुसार खेळण्याचा प्रयत्न करत असल्याने हा बदल झालाय का? असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

संयमाने आणि समजुतदारपणे खेळणं म्हणजे आक्रमकतेला पूर्णविराम लावणं असं होत नाही. आतापर्यंत अनेक दिग्गज खेळाडू हे त्यांच्या नैसर्गिक खेळामुळेच यशस्वी ठरलेत. मात्र केव्हा गिअर बदलायचा आणि केव्हा शांतपणे खेळायचं हे माहित असायला हवं. वैभवने संयमाने, फॉर्मेट आणि गरजेनुसार खेळायलं हवं. मात्र यामुळे वैभवच्या कामगिरीवर परिणाम होणार असेल तर ते त्याच्या भविष्यासाठी हे कितपत योग्य ठरेल? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो.

वैभवलाही इतर खेळाडूंप्रमाणे संतुलन ठेवणं महत्त्वाचं आहे. प्रत्येक बॉल खेळण्याआधी जास्त विचार केल्यास वैभवच्या आत्मविश्वासावर परिणाम होऊ शकतो. तसेच परिस्थितीचा विचार न करता बेछुट बॅटिंग केली तर वैभवला अशाच स्थितीचा सामना करावा लागेल.

वैभवसाठी फॉर्मेटनुसार बदल आव्हानात्मक

आता फक्त 4 डावांच्या आधारे वैभवच्या कामगिरीवर बोट ठेवणं चुकीचं तसेच घाईचं ठरेल. मात्र वैभवसाठी टी 20 ते वनडे हा बदल काहीसा आव्हानात्मक ठरत असल्याचं पाहायला मिळालंय. टी 20I क्रिकेटमध्ये काही चेंडूत खेळ बदलतो. मात्र एकदिवसीय क्रिकेटमध्ये तसं नाही. वनडेत संयमाने खेळ करावा लागतो. एकेरी-दुहेरी धावांसह संधी मिळेल तेव्हा फटकेबाजी करुन खेळी करणं ही कला आहे. वैभवला ही कला आत्मसात करण्यासाठी फार मेहनत घ्यावी लागणार आहे. वैभवची सध्या सुरुवात आहे. वैभव टी 20 क्रिकेटमध्ये माहीर आहे. आता वैभवला वनडेत घट्ट पाय रोवायची गरज आहे.

वैभवचं त्याने केलेल्या कामगिरीसाठी प्रचंड कौतुक करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील त्याच्या कामगिरीचं कौतुक करण्यापासून स्वत:ला रोखू शकले नाहीत. मात्र वैभवला श्रीलंका दौऱ्यातील 4 सामन्यानंतर अनेक प्रश्नांचा आणि आव्हानांचा सामना करावा लागलाय. या ट्राय ए सीरिजमधील अंतिम सामन्यात भारतासमोर यजमान श्रीलंकेचं आव्हान असणार आहे. वैभवकडे आंतरराष्ट्रीय पदार्पणाआधी या अंतिम सामन्यात मोठी खेळी करुन आपण आव्हानांसाठी तयार आहोत हे दाखवून देण्याची संधी आहे. त्यामुळे रविवारी 21 जूनला होणाऱ्या या सामन्यात वैभवच्या कामगिरीकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.