संवादसेतू : साध्य करण्याजोगा 'डिजिटल डीटॉक्स'
esakal June 20, 2026 11:45 AM

‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या चित्रपटातला एक मित्र सहलीला गेल्यावरही ऑफिसच्या कामातच अडकून राहिला आहे. दुसऱ्या दोन मित्रांना त्याचा वैताग येतो आणि एकजण चक्क त्याचा फोन चालत्या गाडीतून फेकून देतो! ‘डिजिटल डीटॉक्स’ म्हटल्यावर डोळ्यांसमोर हेच चित्र उभे राहते. असा फोन फेकून देणे प्रत्येकाला जमेल का?... फोन फेकून देणे सोडाच, पण नुसता फोन दिवसभर बंद करून ठेवणे किंवा चोवीस तास ‘सोशल मीडिया सन्यास’ घेणेही आताच्या काळात अवघडच आहे.

दिवसभरात फोन आपल्या हातातून फार कमी वेळ दूर असतो, जरा कामातून वेळ मिळाला की फोन ‘स्क्रोल’ करणे सुरू होते आणि ‘रील्स’, ‘शॉर्ट्स’ बघता बघता तासभर गेलाय हे कित्येकांच्या लक्षातदेखील येत नाही. ‘फोनवर फार वेळ जातोय बुवा!’ किंवा ‘हल्ली माझ्याकडून इन्स्टा सतत उघडला जातो,’ अशी वाक्ये तुम्हीही ऐकली असतील.

लक्षात घ्यायचा मुद्दा असा, की निरोगी डिजिटल जीवन म्हणजे फोन फेकून देणे/ पूर्णपणे सोडून देणे नव्हे; तर तंत्रज्ञानाचा अधिक जाणीवपूर्वक वापर करणे.

प्रत्येक ‘नोटिफिकेशन’ तातडीचे नसते

प्रत्येक ॲपकडून आपल्याला सूचना- ‘नोटिफिकेशन्स’ येत राहतात. पण त्यातील बहुतेक तातडीची नसतात. तरी सतत ‘बीप’ वाजत राहते, मोबाईल ‘व्हायब्रेट’ होत राहतो आणि आपले लक्ष वेढले जाते. यासाठी बिनमहत्त्वाच्या ॲप्सची नोटिफिकेशन्स बंद करून पाहा. ही ॲप्स तुम्ही नंतर तुमच्या सोयीने पाहू शकता.

दिवसाची सुरुवात आणि शेवट

आपल्यापैकी अनेक जण उठल्या उठल्या ‘रील्स’चा समाचार घेतात आणि झोपतानाही फोन स्क्रोल करत वा व्हिडिओ बघतच झोपतात! किमान दिवसातील पहिली आणि शेवटची १५ मिनिटे फोनपासून दूर राहून पाहा. उठा, खिडकीतून बाहेर बघा, मस्त आळस द्या, थोडे ‘स्ट्रेचिंग’ करा... अशी दिवसाची सुरूवात जास्त ‘फ्रेश’ वाटते की नाही?... फोन आपलाच आहे- तो नंतर पाहता येईल!

अखंड ‘स्क्रोलिंग’

समाजमाध्यमे आणि छोट्या व्हिडिओंची रचनाच अशी असते, की आपण सतत त्यात गुंतून राहावे. त्याची आपल्याला इतकी सवय लागलेली असते की ते एकदम थांबवणे शक्य नाही. पण स्क्रोलिंग करायला घेतल्यावर टायमर लावता येईल का?... हल्ली विशिष्ट कालावधीसाठी स्क्रोलिंग केले वा समाजमाध्यमे वापरली की त्याचेही नोटिफिकेशन देणारी ॲप्स आली आहेत. तंत्रज्ञान योग्य रितीने वापरण्यासाठी तंत्रज्ञानाचाच वापर असा करता येईल.

स्वतःला अधूनमधून विचारा- मी खरेच याचा आनंद घेतोय/ घेतेय का? मला नवीन शिकायला मिळते आहे का? की मी केवळ सवयीने स्क्रोल करतोय?... मनोरंजनात काहीच गैर नाही. पण ते जाणीवपूर्वक करणे आणि नकळत करत राहणे यात फरक आहे.

काही ‘फोन-मुक्त’ क्षण

‘डिजिटल डीटॉक्स’ म्हणजे आठवडाभर फोन बंद ठेवणे नाही. छोटी व साध्य करण्याजोगी उद्दिष्टे ठेवा. उदा. जेवताना फोन बाजूला ठेवणे, एखाद्याशी बोलताना सतत मेसेज/ व्हॉट्सॲप न पाहणे, कधीतरी चालायला जाताना मोबाईल किंवा हेडफोनशिवाय जाणे, दिवसातला वा आठवड्यातला थोडा वेळ मोबाईलशिवाय केवळ पुस्तक वाचनाला किंवा एखादा छंद जोपासायला देणे. इ. असे छोटे विरामही ताजेतवानेपणा देऊ शकतात.

तंत्रज्ञान हे उत्तम साधन आहे यात दुमत नाही. ते आपल्याला जगाशी जोडून ठेवते, नवीन गोष्टी शिकायला मदत करते आणि कामे अधिक सोपे करते. पण चांगली झोप, छंदांमधून मिळणारे समाधान, मित्र वा जवळच्या व्यक्तींबरोबर गप्पा मारताना होणारा आनंद किंवा स्वतःबरोबर घालवलेले निवांत क्षण यांची जागा तंत्रज्ञान वा मोबाईल घेऊ शकत नाही. आवश्‍यक कारणांसाठी फोन व समाजमाध्यमांचा वापर करत असतानाच अनावश्‍यक वापर नक्की कमी करता येईल. आल्याला ज्या गोष्टींसाठी वेळ द्यायला आवडेल, तो वेळ नकळत फोनने व्यापून टाकू नये, याची काळजी घ्यायलाच हवी.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.