आज भारतातील प्रत्येक व्यक्ती ओळखतो अशी एक कंपनी म्हणजे Reliance Industries. देशातील सर्वात मोठ्या कंपनीमध्ये रिलायन्सचा समावेश होतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की रिलायन्स म्हणजे अंबानी कुटुंब. पण तुम्हाला माहिती आहे का की आज 18 लाख कोटी मार्केट वॅल्यू असणाऱ्या देशातील या सर्वात मोठ्या कंपनीच्या साम्राज्याची सुरुवात फक्त 15 हजार रुपयांपासून झाली होती.
रिलायन्सची सुरुवातरिलायन्स इंडस्ट्रीजची स्थापना धीरूभाई अंबानी यांनी केली. 28 डिसेंबर 1932 रोजी गुजरातातील चोरवाड गावात एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या धीरूभाई यांच्याकडे कोणतीही खानदानी संपत्ती नव्हती. मात्र स्वत:च्या कष्टाच्या जोरावर धीरूभाईंनी 1958 मध्ये वयाच्या 26 व्या वर्षी 15 हजार रुपयांच्या भांडवलात रिलायन्स कमर्शियल कॉर्पोरेशन या कंपनीची सुरुवात केली.
मुंबईत एका छोट्याशा कार्यालयातून या व्यवसायाची सुरुवात झाली. त्या काळात त्यांच्या ऑफिसमध्ये स्वतःचा टेलिफोनही नव्हता. त्यामुळे धीरूभाई शेजारील एका डॉक्टरांचा फोन व्यवसायाशी संबंधित सर्व व्यवहार करण्यासाठी वापरत असत.
कसा वाढला व्यवसायरिलायन्स सुरुवातीला मसाल्यांच्या व्यापारात काम करत होते. मात्र त्यांना लवकरच लक्षात आले की मसाल्यांपेक्षा सूत आणि वस्त्रोद्योगात अधिक संधी आहेत. त्यानंतर त्यांनी अहमदाबादजवळील नरोडा येथे कापड उत्पादनाचा व्यवसाय सुरू केला. याच निर्णयामुळे रिलायन्सच्या वाढीला वेग मिळाला आणि कंपनीने वस्त्रोद्योगात मजबूत स्थान निर्माण केले. धीरूभाई अंबानी यांनी 'विमल' या प्रसिद्ध कापड ब्रँडची सुरुवात केली.
शेअर बाजारात एंट्री1977 मध्ये रिलायन्सने शेअर बाजारात IPO आणला. त्या काळात या IPO ला मोठा प्रतिसाद मिळाला आणि सुमारे 58 हजार गुंतवणूकदारांनी त्यात सहभाग घेतला. यानंतर रिलायन्सचे शेअर्स हळूहळू गुंतवणूकदारांच्या पसंतीस उतरू लागले. कंपनीची वाढ पाहून अनेक दलाल आणि प्रतिस्पर्धीही सक्रिय झाले. मात्र धीरूभाई यांनी आपल्या व्यावसायिक कौशल्याच्या जोरावर प्रत्येक आव्हानाचा सामना केला. 1990 च्या दशकापर्यंत रिलायन्सशी सुमारे 24 लाख गुंतवणूकदार जोडले गेले होते.
गेमचेंजर बैठक1985 मध्ये धीरूभाई अंबानी यांनी मुंबईतील कूपरेज फुटबॉल मैदान भाड्याने घेऊन भागधारकांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला तब्बल 12 हजारांहून अधिक भागधारक उपस्थित होते. अनेकांना खुर्च्या न मिळाल्याने त्यांनी मैदानावर बसूनच बैठक ऐकली. त्या काळातील ही देशातील सर्वात मोठी भागधारक बैठक मानली जाते. या बैठकीत धीरूभाई यांनी कंपनीच्या आर्थिक कामगिरीची माहिती गुंतवणूकदारांसमोर मांडली त्यामुळे गुंतवणूकदार रिलायन्सकडे आणखीनच आकर्षित झाले.
मुकेश अंबानी बनले सर्वेसर्वा2002 मध्ये धीरूभाई अंबानी यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र मुकेश अंबानी यांनी रिलायन्सची धुरा सांभाळली. त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने पेट्रोकेमिकल्स, रिफायनिंग, रिटेल, डिजिटल सेवा आणि दूरसंचार अशा अनेक क्षेत्रांत विस्तार केला. आज रिलायन्स इंडस्ट्रीज ही भारतातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक असून जगातील अग्रगण्य कंपन्यांमध्ये तिची गणना केली जाते.
जिओ ठरला धुरंधरत्यानंतर रिलायन्स जिओच्या माध्यमातून कंपनीने भारतीय दूरसंचार क्षेत्रात मोठी क्रांती घडवून आणली. स्वस्त डेटा आणि परवडणाऱ्या रिचार्ज योजनांमुळे इंटरनेट सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले. जिओच्या आगमनानंतर इतर दूरसंचार कंपन्यांनाही आपल्या योजना आणि दरांमध्ये बदल करावे लागले. आज रिलायन्सचा व्यवसाय ऊर्जा, दूरसंचार, रिटेल, डिजिटल सेवा आणि वित्तीय क्षेत्रांसह अनेक उद्योगांमध्ये विस्तारलेला असून 4 लाखांहून अधिक कर्मचारी या समूहाशी जोडले गेलेले आहेत.