Maharashtra News Live Update : "पक्षातून नेते का निघून जात आहेत? आत्मपरीक्षण करा"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
Sarkarnama June 20, 2026 01:45 PM
"पक्षातून नेते का निघून जात आहेत? आत्मपरीक्षण करा"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

शेतीमालाच्या हमीभावाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर टीका करत आमदार-खासदारांचा हमीभाव ठरल्याचा आरोप केला. यावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी ठाकरेंनी इतरांवर आरोप करण्याऐवजी पक्षातून अनेक नेते आणि कार्यकर्ते का बाहेर पडत आहेत, याचा गंभीरपणे विचार करावा, असा सल्ला दिला. तसेच जनतेसमोर वास्तव मांडण्याची गरज असल्याचेही त्यांनी म्हटले.

पावसाअभावी पेरण्या मंदावल्या; शेतकऱ्यांना घाई न करण्याचा कृषी विभागाचा सल्ला

अमरावती जिल्ह्यात मान्सूनच्या कमी पावसामुळे खरीप हंगामातील पेरण्या संथ गतीने सुरू आहेत. आतापर्यंत फक्त 1800 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यंदा जिल्ह्यात सुमारे 6.5 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे लक्ष्य आहे. पुरेसा आणि समाधानकारक पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. 24 ते 25 जूननंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

नाशिककरांना पाणीटंचाईचा फटका; आज पाणीपुरवठा बंद, उद्या कमी दाबाने पाणी

मान्सूनला उशीर झाल्याने नाशिक शहरात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. गंगापूर, मुकणे आणि दारणा धरणांतील जलसाठा कमी झाल्यामुळे महापालिकेने आज संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या कमी दाबाने पाणी दिले जाणार आहे. 31 ऑगस्टपर्यंत उपलब्ध पाणीसाठा पुरवण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर असून, विहिरी कोरड्या पडल्याने खासगी टँकरची मागणीही वाढली आहे.

पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा आज निकाल; 20 वर्षांनंतर न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय 

राज्यात खळबळ उडवणाऱ्या पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल आज मुंबईतील न्यायालयात जाहीर होण्याची शक्यता आहे. दोन दशकांपासून सुरू असलेल्या या खटल्यात माजी गृहमंत्र्यांसह 9 आरोपींना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 2006 मध्ये पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी यांची हत्या झाली होती. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता.

गृहमंत्री अमित शाह कोल्हापूर दौऱ्यावर

केंद्रीय मंत्री अमित शहा कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. मध्यरात्री दोन वाजून दहा मिनिटांनी ते कोल्हापूर विमानतळावर दाखल झाल्यानंतर राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक, भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव, यांच्यासह जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख, पोलीस महानिरीक्षक यांनी त्यांचे स्वागत केले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.