NTA चा अजब कारभार! नागपूरच्या विद्यार्थ्याला थेट ‘अबू धाबी’चे परीक्षा केंद्र; ‘नीट’च्या गोंधळामुळे कुटुंब मानसिक तणावात
Marathi June 20, 2026 03:25 PM

देशभरात गाजत असलेल्या नीट परीक्षेतील गोंधळ थांबण्याचे नाव घेत नाही आहे. रविवार, 21 जून रोजी होणाऱ्या नीटच्या पुनर्परीक्षेपूर्वी राष्ट्रीय परीक्षा एजन्सीचा निष्काळजीपणाचा प्रकार समोर आला आहे. नागपूरच्या एका 18 वर्षीय विद्यार्थ्याला नागपूर किंवा वर्धा ऐवजी थेट 2 हजार 500 किलोमीटर दूर असलेल्या युएईमधील अबू धाबी येथील परीक्षा केंद्र अलॉट करण्यात आले आहे. या अजब कारभारामुळे संबंधित विद्यार्थी आणि त्याचे कुटुंबीय प्रचंड मानसिक तणावाखाली आले आहेत.

नागपूरचा रहिवासी असलेल्या अब्दुल्ला मोहम्मद तालीब या विद्यार्थ्याने पुनर्परीक्षेसाठी अर्ज करताना नागपूर, वर्धा आणि भंडारा या जवळच्या केंद्रांना पसंतीक्रम दिला होता. मात्र, 14 जून रोजी जेव्हा त्याचे हॉलतिकीट जनरेट झाले तेव्हा त्यावर केंद्र म्हणून अबू धाबी इंडियन स्कूल असे लिहिलेले होते. हे पाहून अब्दुल्ला आणि त्याच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.

माझ्याकडे पासपोर्ट किंवा व्हिसा नाही. अवघ्या 24 ते 48 तासांत या सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून परदेशात परीक्षेसाठी जाणे आमच्यासाठी अशक्य आहे. आधीच पेपरफुटीच्या वादामुळे मी तणावात होतो, त्यात आता या नव्या गोंधळामुळे माझे भवितव्य धोक्यात आले आहे, अशी उद्विग्न प्रतिक्रिया अब्दुल्ला याने दिली.

दरम्यान, हा प्रकार समोर आल्यानंतर माजी मंत्री आणि काँग्रेस नेते डॉ. अनीस अहमद यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. NTA ने परीक्षेची पारदर्शकता पूर्णपणे धुळीस मिळवली आहे. आम्ही या प्रकरणी NTA च्या हेल्पलाइनवर संपर्क साधला असून तांत्रिक चूक सुधारण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे. शनिवार संध्याकाळपर्यंत अब्दुल्लाला नागपूरचे सुधारित हॉलतिकीट दिले जाईल असे सांगण्यात आले आहे, असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

…तरीही पालकांनी सुरू केली होती तिकीट काढण्याची तयारी!

दुसरीकडे, मुलाचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून तालीब कुटुंबीयांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही पासपोर्ट आणि विमानाचे तिकीट काढण्याची चाचपणी सुरू केली होती. परीक्षा चुकवून चालणार नसल्याने, जर केंद्र बदलले नाही तर कोणत्याही परिस्थितीत त्याला अबू धाबीला पाठवण्याची मानसिक तयारी पालकांनी केली होती. विशेष म्हणजे फक्त अब्दुल्लाच नाही, तर नागपूरमधील अनेक पालकांनी NTA च्या कारभारावर आक्षेप घेतला आहे. आधीचे केंद्र कायम ठेवण्याचा पर्याय निवडलेला असतानाही, अनेक विद्यार्थ्यांची केंद्रे शहराबाहेर किंवा दूरच्या जिल्ह्यांत बदलण्यात आली आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.