महाराष्ट्रातील खासदारांच्या फोडाफोडीवरून राज ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया
अमित शहा यांचं नाव घेऊन केला गंभीर आरोप
राज ठाकरेंच्या वक्तव्याने आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या फोडाफोडीच्या राजकारणावरून जोरदार टीका केली. मनसे अध्यक्षांनी अमित शहा यांच्या नावाचा उल्लेख करत खळबळजनक दावा केला. ठाकरेंचे खासदार हे भाजपऐवजी शिंदेंकडे गेले? अमित शहा हे २०२९ ची स्वत:साठी तयारी करत असल्याचा दावा राज ठाकरेंनी केला. राज ठाकरेंच्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. मुंबईतील मनसे मेळाव्यात त्यांनी मोठा दावा केला.
राज ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे
मला वाद नको. परंतु वाद उकरून काढत असाल, तर आम्ही रस्त्यावर उभे राहू. जैन समाजातील काही जण भेटायला येणार आहेत. रस्त्यावर कसले पांढरे पट्टे मारताय. हायवेवर जाताना काही होत नाही. अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. आधी कबुतराचा वाद काढला होता. हे जाणूनबुजून करत आहेत. या सर्व गोष्टीत गुंतून ठेवायचं प्रयत्न सुरू आहे. ही गोष्ट गांभीर्याने घेतली पाहिजे.
कोणाची सत्ता आहे, कोणाला सत्ता मिळवायची आहे. हे सोडून द्या. आपण राज्य आणि देशाचं किती नुकसान करत आहोत. बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. महाराष्ट्रात अजून पाऊस पडला नाही. दुष्काळाची परिस्थिती येऊ शकते. दुसरीकडे महाराष्ट्रात खासदार फोडणे सुरू आहे. १०० कोटी रुपयांसाठी विकले जात आहेत. तुम्ही दोन-तीन तास रांगेत उभं राहून मत देता. यांना तुम्ही निवडून देणार का? आताच्या राजकारणाविषयी पुढील पिढीला काय सांगाल.
देशात आत्महत्येचं प्रमाण किती वाढलंय, प्रत्येक राज्यात आत्महत्या होत आहेत. शेतकरी आत्महत्या करत आहेत. नीट पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहे. खासदारांसारखे लहान मुले पळवली जात आहेत. मुली पळवल्या जात आहेत. सत्ता टिकवण्यासाठी आमदार-खासदार फोडणे सुरू आहे. मेंढरासारखे रांगेत उभे राहून मतदान करायला उभे असतो. याला आपण निवडणूक म्हणणार का, या पळवापळवीच्या राजकारणात महाराष्ट्राचा स्वाभिमान, पंरपरा विसरत चाललो आहे.
भारताच्या पॉवर मिनिस्ट्रीने वीज वितरणमध्ये महाराष्ट्राला शंभरपैकी दीड गुण मिळाला आहे. यांचा आता आयपीओ येत आहे. लोकांकडून पैसे घेण्यासाठी आयपीओ येत आहे. महाराष्ट्राची वीज अदानी विकत घेतील. तुम्हाला अंधारात कसं ठेवायचं, याचे उपाय सुरू आहेत. जंगल,जमिनी दिली जात आहेत. वीज आणि पाणी दिलं जाईल. तुम्ही गुलाम आहात का? हे सर्व दिल्यानंतर आपल्याला आंदोलनात गुंतून ठेवतील. दुसरीकडे हे एसआयरचं काम सुरू करतील.
मतदारांचे नाव नसतील, तर तुम्ही काही करू शकत नाही. ममता बॅनर्जी यांची २७ लाख मते काढली. ममता बॅनर्जी निवडणुकीतून पडल्या. संपूर्ण सत्ता घेतली. सत्तेवर कोण बसलं, यापेक्षा सत्तेवर बसून काय करताय, हे महत्वाचं आहे. राज्यात, देशात काय पायंडे पाडत आहोत, याचे भान राहिलेलं नाही.
लाडकी बहीण योजना आणली, महिला सक्षमीकरणावर भर द्या. महिन्याला १५०० देताय, ते कुठे जाताय, ते बघा. फुकट दिल्याने देश चालत नाही. फुकट दिल्यानंतर दुसरीकडे काही गोष्टी काढून घेत आहेत. एक रुपया देऊन १० रुपये काढून घेताय. भविष्यातील पिढ्यांचं काय नुकसान करताय, हे कळत नसेल. तर निवडणुकीला चाटायचं आहे का?
सत्तेचा मार्ग मतदारयादीतूनच जातो. खोट्या मतदारांवर आक्षेप घेतला पाहिजे. महाराष्ट्रात अनेक हितचिंतक आहेत. सर्वांची साथ हवी आहे. पक्षाला मदत करावी. तुम्ही वरवरचं राजकारण करून काही होणार नाही. आंदोलन घरापर्यंत पोहोचतं. पण मत मतपेटीत पोहोचत नाही.
जगाला हेवा वाटावा, असा महाराष्ट्र माझ्या हातून घडावा, असं मला वाटतंय. त्यासाठी सत्ता नको का....? आता घर जनगणना झाली. त्यांच्यासोबत भाजपचे लोक होते. हे तुम्हाला नको कळायला? त्यांच्याशी बोलताना त्यांना त्यांच्या मतदाराविषयी कळते. खरंतर डोळ्यात तेल लावून लक्ष द्या. तीन वर्षात काय गायब होईल, हे कळणार नाही.
केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. ६ खासदार भाजपऐवजी शिंदेंकडे का गेले? केंद्रात नेमकं काय राजकारण सुरू आहे. अमित शहा २०२९ ची स्वत:ची तयारी करत आहे. भाजपमधील सोबत असतील, इतर गट देखील सोबत हवेत. भाजपमध्ये अंतर्गत गोंधळ सुरू आहे. नरेंद्र मोदी असल्याने सर्व शांत आहे. वर्षभरात गोंधळ निर्माण होतील. त्यासाठी तुम्ही तयारीत राहिलं पाहिजे. यासाठी एसआयरसाठी तयारी करा.