IIT- बॉम्बेच्या आवारात बिबट्याची एन्ट्री, कुत्र्यावर भयानक हल्ला अन्… CCTV फुटेज समोर येताच…
Tv9 Marathi June 20, 2026 05:45 PM

गेल्या काही महिन्यांपासून वन्य प्राणी नागरी वस्तींमध्ये येऊन दहशत माजवत आहेत. यामध्ये अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागले आहेत. दरम्यान, शुक्रवारी पहाटे पवई येथील आयआयटी-बॉम्बेच्या आवारात बिबट्याने कर्मचारी वसतिगृहाच्या परिसरात प्रवेश केल्याने खळबळ उडाली होती. संबंधित संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. घटनेचे फुटेज आता सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहेत. सुदैवाने, या घटनेत कोणताही विद्यार्थी, कर्मचारी किंवा इतर व्यक्तीला कोणतीही इजा झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री जवळपास 2.30 वाजता बिबट्या कर्मचारी वसतिगृहाच्या परिसरात दिसला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असल्याप्रमाणे, बिबट्या एका भटक्या कुत्र्यावर हल्ला करतो, त्याला पकडतो आणि झुडपांच्या दिशेने ओढत नेतो. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर कॅम्पसमध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये सतर्कता वाढली आहे.

A Leopard Entered IIT Bombay Campus at Staff Hostel and Viciously Attacked a Dog Caught on CCTV Camera😳 pic.twitter.com/bsfcUvBTXS

— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) June 19, 2026

वन विभाग अलर्ट, वाढवण्यात आली सुरक्षा…

या घटनेची माहिती मिळताच, आयआयटी-बॉम्बे प्रशासनाने सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे. वनविभागाचे एक पथकही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. सध्या तरी, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना रात्री उशिरा किंवा पहाटेच्या वेळी निर्जन भागात एकटं जाणं टाळण्याचं आणि एखादे वन्यप्राणी आढळल्यास त्वरित प्रशासनाला कळवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

पवई येथील आयआयटी-बॉम्बेचा परिसर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि त्यालगतच्या हरित पट्ट्या जवळ वसलेला आहे. त्यामुळे, या भागात यापूर्वी अनेकदा बिबट्यांचा वावर असल्यां दिसून आलं आहे. तज्ज्ञांच्या मते, अन्नाच्या शोधात असताना किंवा जंगलाला लागून असलेल्या भागांतून फिरताना बिबटे कधीकधी मानवी वस्तीच्या परिसरात येतात.

CCTV व्हिडीओमुळे वाढली चिंता

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे शहरी भाग आणि वन्यजीव यांच्यातील वाढता संपर्क दिसत असून, तो भयानक असल्याचं चित्र देखील दिसत आहे… मिळालेल्या माहितीनुसार, सध्या वनविभाग त्या परिसरावर लक्ष ठेवून असून बिबट्याच्या हालचालींवर बारकाईने नजर ठेवत आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.