Pavanraje Nimbalkar : माफीचा साक्षीदार कोण, ज्याच्यामुळे बदलला पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल
esakal June 20, 2026 06:45 PM

काँग्रेसचे नेते पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणी सीबीआय विशेष न्यायालयाने पद्मसिंह पाटील यांच्यासह ९ आरोपींची निर्दोष मुक्तता केली. माफीचा साक्षीदार फितूर झाल्यानं आणि तपासात त्रुटी आढळल्याचं निरीक्षण नोंदवत न्यायालयाने निकाल दिला. पवनराजे निंबाळकर यांची नवी मुंबईतील कळंबोली इथं ३ जून २००६ रोजी गोळ्या झाडून हत्या झाली होती. या प्रकरणी मुख्य आरोपी माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील हे होते. पवनराजेंची हत्या करण्यासाठी लातूरचे व्यावसायिक सतीश मंदाडे आणि मोहन शुक्ला यांच्या माध्यमातून पारसमल जैनला ३० ते ३५ लाखांची सुपारी दिली होती असा आरोप होता. Who Was the Approver in Pavanraje Nimbalkar Murder Case

पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येनंतर जवळपास ३ वर्षे तपासात पोलिसांच्या हाती काहीच लागले नव्हते. २००९मध्ये गुन्हे शाखेला डोंबिवली-मुंब्रा परिसरात एक सोन्याचा व्यापारी दरोड्याच्या गुन्ह्यात पकडला गेला. मी एक खूप मोठं काम केलंय अशी फुशारकी त्याने मारली. तेव्हा पोलिसांनी खाक्या दाखवताच थेट पवन राजेनिंबाळकर यांच्या हत्येची कबुली त्याने दिली. यावेळी त्याने शूटर (दिनेश तिवारी व इतर) लोकांची नावे सांगितली.

पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल विरोधात; आता ओमराजे कोणती भूमिका घेणार?

गुन्ह्याची कबुली सर्वात आधी देणाऱ्या पारसमल जैन यानेच खटल्यात माफीचा साक्षीदार बनण्याची तयारी दाखवली. त्याने दिलेल्या कबुलीच्या जोरावर सीबीआयने थेट माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांना २००९मध्ये अटक केली. पारसमल जैन याने जबाबात सांगितलं होतं की, पवनराजे निंबाळकर यांच्यानंतर सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांचीही सुपारी पद्मसिंह पाटील यांनी दिली होती.

विशेष सीबीआय कोर्टाने निकाल देताना माफीच्या साक्षीदाराची साक्ष विश्वासार्ह नसल्याचं नमूद केलं. माफीचा साक्षीदार असलेल्या पारसमल जैन याच्या जबाबात सातत्य नव्हते. त्याने सतत जबाब बदलले. पोलिसांनीही सुरुवातीला बेकायदेशीर कोठडीत ठेवलं. मारहाण करत हा जबाब लिहून घेतला होता. त्यामुळे कोर्टाने पारसमल जैनचा जबाब अमान्य ठऱवला. संशयाचा फायदा देत कोर्टाने पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.