Devendra Fadnavis : रवींद्र चव्हाणांच्या नावाचा पुकार होताच मुख्यमंत्री फडणवीसांनी हस्तक्षेप करत राखला एकनाथ शिंदेंचा मान
Tv9 Marathi June 20, 2026 04:45 PM

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. कोल्हापूर अंबाबाई मंदिराचं सुशोभिकरण सुरु होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोघेही या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. यावेळी कार्यक्रमाच्या आयोजकांकडून आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याऐवजी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं नाव सत्कार करण्यासाठी पुकारण्यात आलं. रवींद्र चव्हाण भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. आयोजकांनी रवींद्र चव्हाण यांचं नाव सत्कारासाठी पुकारल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोजकांना आधी एकनाथ शिंदे यांचा सत्कार करायला सांगितला.
एकनाथ शिंदे यांच्यानंतर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा सत्कार केला गेला.

“अमित भाई शाह हे आमच्या कोल्हापूरचे जावई आहेत. आम्ही गृहमंत्री म्हणून सरदार वल्लभभाई पटेलांचे नाव ऐकले होते. मात्र गृहमंत्री अमित भाई यांना आम्ही जवळून पाहतोय हे विशेष. कोल्हापूर हे शहर आणि खेडे आहे. कोल्हापूर मध्ये येणारे भाविक वाढले आहेत. त्यामुळे आता शहराचा विस्तार गरजेचा आहे” असं शिवसेना शिंदे गटाचे मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले. “कोल्हापूरला सर्किट बेंच दिले, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. तिरुपती प्रमाणे आता कोल्हापूरला रस्ते, फ्लायओव्हर होतील. कोल्हापूरचे नाव देशात डंका वाजत राहू दे” असं प्रकाश आबिटकर म्हणाले.

महायुतीचे 10 च्या 10 आमदार निवडून दिले

“आम्ही विधानसभा प्रचारावेळी आपल्याला शब्द दिला होता, त्याप्रमाणे कोल्हापूर मधून महायुतीचे 10 च्या 10 आमदार निवडून दिले. आपण देखील कोल्हापूरला मोठ्या प्रमाणात निधी दिला, त्याबद्दल आभार. कोल्हापूर मंदिराला केंद्राच्या प्रसाद योजनेचा आपल्याला लाभ व्हावा अशी आमची मागणी आहे” असं भाजप खासदार धनंजय महाडिक म्हणाले.

त्यांनी ते करुन दाखवलं आहे

“शक्तीपीठाच्या आधुनिकीकरण आणि सुशोभीकरणाला आज सुरुवात होतेय. अमित भाईंच्या हस्ते या विकास कामाची सुरुवात होतेय. अमित भाई कोल्हापूर के दामादजी है. देशातील नक्षलवाद 2026 पर्यत संपवणार असे अमित भाईंनी सांगितले होते. त्याप्रमाणे त्यांनी ते करुन दाखवलं आहे. त्यांनी शब्द दिला म्हणजे पत्थर की लकीर है. ते एखाद्याच्या पाठीशी पहाडाप्रमाणे उभे राहतात” असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. “सहकार क्षेत्र मूठभर लोकांच्या हातात होतं, ते त्यांनी सर्वासाठी खुलं केलं. साखर कारखाने, शेतकरी अडचणीत आल्यावर अमित भाईंनी 10 हजार कोटी कर माफ केले” असं एकनाथ शिंदे म्हणाले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.