Gas Cylinder Blast : छत्रपती संभाजीनगरात सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
esakal June 20, 2026 08:45 PM

छत्रपती संभाजीनगर - शहरातील गारखेला परिसरातील पुंडलिकनगर येथील महारुद्र हनुमान मंदिराजवळ शनिवारी (ता. २०) पहाटे दोन मजली बिल्डिंगमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन एका महिलेचा मृत्यू झाला. या घटनेत संपूर्ण घर जळून खाक झाले.

पुंडलिकनगर येथील महारुद्र हनुमान मंदिराजवळ रस्त्यावरच दुमजली इमारत असून, या इमारतीत खाली दुकाने व वरती निवासी घरे आहेत. दुकानाच्या पाठिमागे देखील खोल्या काढून किरायाने देण्यात आल्या आहेत. शनिवारी पहाटे ४.३५ वाजता एका दुकानाला आग लागली. आगीने रौद्ररूप धारण केले. क्षणार्धात पाठिमागे खोलीत ठेवण्यात आलेल्या चार सिलिंडरमधील एका सिलिंडरला गळती लागून स्फोट झाला.

गॅस सिलिंडरच्या स्फोटाने पुंडलिकनगर हादरले. अनेकांच्या घरांना हादरे बसले. पाठिमागच्या खोलीत राहणा-या सुनंदा राजेंद्र मोरे (वय-४५) या महिलेचा जागेवरच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन पथकाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. तसेच परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन तातडीने घरातील ९ व्यक्तींना सुखरूप बाहेर काढले.

यावेळी मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक एन. खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उप अग्निशमन उप अग्निशमन केंद्र अधिकारी विनायक कदम, संजय कुलकर्णी, छत्रपती केकान, संदीप चव्हाण,अग्निशामक जवान अशोक वेलदोडे, बाबासाहेब ताठे,अक्षय नागरे, सचिन शिंदे, मतीन शेख, विलास झरे, माधव गाडे,वाहन चालक चंदनशिव,गव्हाड, नंदू घुगे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.