Ishwarpur News : उत्तर अमेरिकेच्या देनाली शिखरावर फडकवला भारताचा तिरंगा! पडवळवाडीच्या संभाजी गुरव यांची 'षटकार सप्त शिखरांची' मोहीम
esakal June 20, 2026 09:45 PM

ईश्वरपूर (जिल्हा सांगली) - जिद्द, चिकाटी आणि शिस्तबद्ध तयारीच्या जोरावर पडवळवाडी, ता. वाळवा येथील तसेच महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी संभाजी गुरव यांनी उत्तर अमेरिका खंडातील सर्वोच्च शिखर माऊंट देनाली सर करत भारताचा तिरंगा आणि महाराष्ट्र पोलीस दलाचा ध्वज अभिमानाने फडकवला आहे. यासोबतच त्यांचा जगातील ७ खंडांमधील सर्वोच्च शिखरे सर करण्याचा ‘षटकार सप्त शिखरांचा’ हा संकल्प त्यांनी पूर्ण केला आहे.

१७ जूनला सायंकाळी ५ वाजता ६ हजार १९० मीटर उंचीचे देनाली शिखर संभाजी गुरव यांनी सर केले. यापूर्वी त्यांनी मे २०२१ मध्ये जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट, जुलै २०२१ मध्ये युरोप खंडातील एल्ब्रुस, ऑगस्ट २०२१ मध्ये आफ्रिका खंडातील किलीमांजारो, २०२२ मध्ये ऑस्ट्रेलिया खंडातील कोसियुस्को आणि जानेवारी २०२३ मध्ये दक्षिण अमेरिका खंडातील अॅकांकाग्वा ही शिखरे यशस्वीरित्या सर केली आहेत.

देनाली सर करण्याचा हा त्यांचा ३ रा प्रयत्न होता. २०२३ मध्ये शिखरापासून अवघ्या २०० मीटर अंतरावर असताना भीषण वादळ, शून्य दृष्यमानता आणि प्रचंड वेगाच्या वाऱ्यांमुळे सुरक्षिततेचा विचार करून त्यांना नाईलाजाने माघार घ्यावी लागली होती. २०२५ मध्ये दुसऱ्या प्रयत्नातही हवामानाने साथ दिली नाही. मात्र या अपयशांनी त्यांची जिद्द अधिक मजबूत केली. यंदा त्यांनी तेजस्विनी गॉलिस्टन लडाख आणि डॉ. राजशेखर रेड्डी हैद्राबाद यांना सोबत घेऊन ‘मिशन देनाली’ ही मोहीम आखली.

५ जूनपासून सुरू झालेल्या या मोहिमेत स्की हिल, मोटरसायकल हिल, विंडी कॉर्नर अशा तांत्रिक आणि दमछाक करणाऱ्या टप्प्यांमधून मार्गक्रमण केले. चढाईदरम्यान प्रत्येक गिर्यारोहकाला ३० ते ५५ किलोपर्यंत वजन असलेले साहित्य स्वतः वाहून न्यावे लागले. आर्क्टिक सर्कलजवळ असल्याने येथे हवामान काही क्षणांत बदलते. काही वेळा ५० ते १०० किलोमीटर वेगाचे वारे आणि बर्फाचे वादळ अशी परिस्थिती निर्माण होते. कमी प्राणवायू आणि सतत बदलणाऱ्या वातावरणाचा सामना करत त्यांनी नियोजनबद्ध वाटचाल केली.

मुंबईतील शासकीय जबाबदाऱ्या आणि सततच्या कार्यभारामुळे मागील १५ वर्षांच्या पोलीस सेवेत व्यस्त सांभाळत त्यांनी दररोज पहाटे ५ ते ७ या वेळेत नियमित शारीरिक तयारी करून स्वतःला मोहिमेसाठी सज्ज ठेवले. कठोर प्रशिक्षण, पूर्वानुभव आणि अचूक निर्णयक्षमतेच्या जोरावर अखेर त्यांनी ही मोहीम फत्ते केली.

या संपूर्ण मोहिमेदरम्यान पथकातील सर्व सदस्य सुरक्षित राहिले आणि मोहीम १०० टक्के यशस्वीपणे पूर्ण झाली. मोहिमेच्या तयारीपासून प्रत्यक्ष चढाईपर्यंत आहारतज्ज्ञ सुजाता गुरव यांच्या अचूक आहार नियोजन आणि मार्गदर्शनामुळे आवश्यक शारीरिक क्षमता टिकवून ठेवता आली. तसेच मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या सहकार्याबद्दल त्यांनी विशेष कृतज्ञता व्यक्त केली आहे. अपयशातून उभे राहून यश संपादन मिळवण्याच्या संभाजी गुरव यांच्या या कामगिरीमुळे महाराष्ट्र पोलीस दलासह गिर्यारोहण क्षेत्रात आनंद आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.