जर्मनीची आर्थिक राजधानी असलेल्या फ्रँकफुर्ट येथे कार्यरत इंडिया-युरोप बिझनेस डेस्क (IEBD) तर्फे इंडिया-युरोप बिझनेस डे 2026 हा प्रमुख कार्यक्रम यशस्वीपणे आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला चार खंडांतील 12 देशांमधून जवळपास 300 व्यावसायिक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन फ्रँकफुर्ट येथील भारताच्या वाणिज्यदूत जनरल श्रीमती शुचिता किशोर यांच्या हस्ते झाले. त्यांनी उद्घाटनपर भाषण केले. कार्यक्रमात कार्लस्रुहे शहराच्या महापौर कार्यालयाचे प्रतिनिधी, इंडिया-युरोप बिझनेस डेस्कच्या सल्लागार मंडळाचे सदस्य, नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NSDC) चे शासकीय प्रतिनिधी, जर्मनीतील उद्योगपती, युरोपियन उद्योजक आणि विविध क्षेत्रातील व्यावसायिक सहभागी झाले.
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रीमंत्री श्री नितीन गडकरी यांनी पाठविलेला शुभेच्छा संदेश. त्यांनी इंडिया-युरोप बिझनेस डेच्या यशासाठी शुभेच्छा देत भारत आणि युरोपमधील आर्थिक व व्यावसायिक संबंध मजबूत करणाऱ्या उपक्रमांचे कौतुक केले. या कार्यक्रमाला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC), एअर इंडिया, युरोपॉर्च्युनिटी जर्मनी आणि देसी ग्लोबल्स यांचे प्रमुख प्रायोजक म्हणून सहकार्य लाभले. तसेच अनेक आघाडीच्या कंपन्या आणि व्यावसायिक भागीदारांनी भारत-युरोप सहकार्य वाढविण्यासाठी पाठिंबा दर्शविला.
भारत आणि युरोप यांच्यातील व्यापार, गुंतवणूक, आणि व्यावसायिक सहकार्य मजबूत करण्यासाठी कार्यरत असलेले इंडिया-युरोप बिझनेस डेस्क सध्या युरोपियन युनियनमधील सहा देशांमध्ये आपले अध्याय (Chapters) सुरू करण्याच्या दिशेने काम करत आहे.
संस्थापक आणि अध्यक्ष अजित रानडे यांनी आपल्या भाषणात युरोपमधील भारतीय समुदायाचे वाढते महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की जर्मनीमध्ये राहणारे सुमारे 3.5 लाख भारतीय आणि संपूर्ण युरोपमध्ये राहणारे जवळपास 10 लाख भारतीय भारत-युरोप आर्थिक संबंध अधिक मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील.
ते पुढे म्हणाले की सध्या भारत आणि युरोपमधील द्विपक्षीय व्यापार सुमारे 180 अब्ज युरो इतका आहे आणि येत्या काही वर्षांत तो 350 अब्ज युरोपर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे दोन्ही बाजूंतील उद्योग, गुंतवणूकदार, व्यावसायिक आणि स्टार्टअप्ससाठी मोठ्या संधी निर्माण होतील.
संस्थेच्या पुढील वाटचालीबाबत माहिती देताना श्री. रानडे यांनी जाहीर केले की इंडिया-युरोप बिझनेस डे 2026 ची पुढील आवृत्ती डिसेंबर 2026 मध्ये भारतात आयोजित करण्यात येईल. यामुळे भारत आणि युरोपमधील व्यापार, व्यवसाय आणि गुंतवणूक संबंध अधिक दृढ होतील.
इंटरनॅशनल टेस्ट इक्विपमेंट यूएसए चे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नितरेश रेगे यांनी इंटर्नपासून सीईओपर्यंतच्या आपल्या प्रेरणादायी प्रवासाची आणि जागतिक व्यवसाय विस्ताराची कहाणी सांगून उपस्थितांची मने जिंकली.
नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NSDC), भारत चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अरुणकुमार पिल्लई यांनी भारतातील कुशल मनुष्यबळाला युरोपमधील उद्योगांच्या गरजांशी जोडण्यासाठी NSDC च्या जागतिक धोरणाची माहिती दिली.
इंडिया-युरोप बिझनेस डेस्क (IEBD) बद्दल
इंडिया-युरोप बिझनेस डेस्क (IEBD) ही युरोपमध्ये राहणाऱ्या भारतीयांनी सुरु केलेली संस्था आहे. भारत आणि युरोप यांच्यातील व्यापार, गुंतवणूक आणि धोरणात्मक सहकार्य वाढविण्यासाठी ही संस्था कार्यरत आहे. जर्मनी, स्वित्झर्लंड, फ्रान्स, स्पेन, लक्झेंबर्ग, नेदरलँड्स, स्वीडन , स्पेन आणि पोलंडमध्ये संस्थेचे चॅप्टर्स आहेत