Satej Patil and Jayant Patil: महायुती सरकारच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित चहापान कार्यक्रमावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला आहे. "ज्यांना जनतेचा कारभार नीट सांभाळता येत नाही, त्यांच्यासोबत चहा पिणे योग्य नाही," अशी घणाघाती टीका करत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरकारला धारेवर धरले. काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार पक्ष) ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत राज्यातील कोलमडलेली अर्थव्यवस्था, कायदा-सुव्यवस्था, वाढता भ्रष्टाचार आणि अंमली पदार्थांचे जाळे यावरून हल्लाबोल केला. '13 कोटी जनतेला अपेक्षित असलेले प्रश्न आम्ही सभागृहात मांडणारच,' असा इशारा दोन्ही पाटलांनी दिला.
सतेज पाटील यांनी म्हटले की, "राज्यात सध्या 56 टक्के दिल्याशिवाय कोणतेही बिल निघत नाही, अशी परिस्थिती आहे." नुकतीच कोल्हापुरात कंत्राटदारांची एक मोठी सभा झाली असून, त्यामध्ये कंत्राटदारांनी आपली व्यथा मांडली आहे. जयंत पाटील यांनी याला दुजोरा देत सांगितले की, "सरकारने कंत्राटदारांचे लाखभर कोटी रुपयांचे बिल थकवून ठेवले आहे." केंद्र सरकारकडून राज्याच्या बजेटमध्ये कपात करण्यात आल्यामुळे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून, आज राज्यातील प्रत्येक नागरिकावर कर्जाचा डोंगर वाढला आहे, असा आरोप नेत्यांनी केला. तसेच, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या इमारतीमधील पाण्याच्या गळतीचा (लिकेज) संदर्भ देत, पायाभूत सुविधांच्या कामांमधील निकृष्ट दर्जा आणि भ्रष्टाचार आता उघड झाला असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंतेजनक परिस्थितीवर सतेज पाटील यांनी गृहखात्याला थेट जबाबदार धरले. नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो (NCRB) च्या आकड्यांचा हवाला देत त्यांनी महाराष्ट्रात गुन्हेगारी प्रचंड वाढल्याचे सांगितले. "राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था इतकी हतबल झाली आहे की, थेट मंत्र्यांना मारहाण होते. मारहाण करणारे लोक उजळ माथ्याने समोर येतात, तरीही त्यांच्यावर कोणतीही कडक कारवाई होत नाही," असा संताप त्यांनी व्यक्त केला. जयंत पाटील यांनी राज्यातील तरुणाईला विळखा घालणाऱ्या अंमली पदार्थांच्या मुद्द्यावर तीव्र चिंता व्यक्त केली. "आज महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात 'ड्रग्ज'चा प्रश्न हा अत्यंत गंभीर आणि प्रमुख विषय बनला आहे. सरकारने यावर तात्काळ उत्तर दिले पाहिजे," अशी मागणी त्यांनी केली. पवित्र अशा 'तपोवन' भूमीलाही सरकारने सोडले नसून तिथेही गैरप्रकार सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.
लाडकी बहीण आणि इतर योजनांचा संदर्भ देत सतेज पाटील म्हणाले की, "तुम्ही तब्बल 14 हजार पुरुषांना अनुदान वाटले आहे. महिलांचे अनुदान पुरुषांना देण्याचा हा सावळागोंधळ काय आहे?" असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच, पश्चिम महाराष्ट्रात तीव्र विरोध होत असलेल्या 'शक्तीपीठ महामार्गा'बाबत बोलताना, "हा मार्ग जनतेच्या बोकांडी मारला जात आहे," अशी घणाघाती टीका त्यांनी केली. 'एल निनो'च्या प्रभावामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य टंचाईची पूर्वसूचना मिळूनही सरकारने पुढे काय उपाययोजना केल्या? असा सवाल करत पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांमुळे सामान्य होरपळत असल्याचे त्यांनी सांगितले. '
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांच्या पत्राला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी तांत्रिक मुद्द्यांवरून टीका केली होती. त्याला उत्तर देताना सतेज पाटील म्हणाले, "मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की, आमच्या पत्रातील व्याकरणाच्या किंवा तांत्रिक चुका काढत बसू नका. आम्ही जे थेट आणि जनहिताचे प्रश्न विचारले आहेत, आधी त्यावर बोला." सध्या विधान परिषद आणि विधानसभा दोन्ही सभागृहांत विरोधी पक्षनेते पद रिक्त ठेवण्यावरूनही जयंत पाटलांनी निशाणा साधला. "मूळ मुद्द्यांना बगल देण्याचे काम सरकारकडून पद्धतशीरपणे चालू आहे. दोन्ही सभागृहांत विरोधी पक्षनेते नसले, तरीही जनतेचे प्रश्न मांडण्याचे साधन आम्ही नक्की बनू. आम्ही सभागृहात या सर्व विषयांवर सविस्तर आणि सडेतोडपणे बोलणार आहोत आणि सरकारला पळ काढू देणार नाही," असा इशारा विरोधी नेत्यांनी दिला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या