IMD Forecast Monsoon Alert Rainfall: मान्सून अडकला आहे. जून महिना आता निरोप घेत आहे, तरीही पावसाने हुलकावणी दिली आहे. जून महिन्यात मान्सूनच्या पावसाची 40 टक्क्यांची तूट आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, चक्रीवादळाशी खेळताना पावसाने मोठी दांडी मारली. वादळी वाऱ्याचा हा पिंगा सध्या राजस्थानच्या पश्चिमी सीमेवर पाकिस्तानी पट्ट्यात तसेच पूर्व बिहार आणि पश्चिम बंगालच्या जवळपास आहे. त्यामुळे मान्सूनचा प्रवास लांबल्याचा दावा करण्यात येत आहे.
बंगालचा सांगावा केव्हा?
भारतावर मान्सूनसाठी कमी दाबाचे दोन पट्टे तयार होणे आवश्यक मानले जातात. त्यापैकी एक सध्या पश्चिम बंगालपर्यंत विस्तारलेला आहे. दुसरा छत्तीसगडपासून ते तामिळनाडूपर्यंत पसरलेला आहे. याच पट्ट्यांमुळे मान्सून उत्तरेकडे ओढला जातो. पण बंगालच्या उपसागरावरील वारे पुढे सरकत नसल्याने पावसाचे आगमन लांबले आहे. मान्सून सक्रिय होण्यासाठी आणि दमदार पावसासाठी दोन्ही बाजूच्या वाऱ्यांचा जोरही तितकाच महत्त्वाचा असतो. तर राजस्थानच्या सीमावर्ती भागातील वाऱ्यांमुळे या राज्यातील पावसाला पूर्वीसारखा जोर दिसला नाही. दमदार सरी बरसल्या नाहीत.
का थांबला मान्सून?
अल निनोचा प्रभाव आहेच. पण ते केवळ एक कारण नाही. दक्षिण हिंद महासागरात एक जबरदस्त उच्चदाबाचे क्षेत्र तयार होते. त्याला मास्कारेन असे म्हणतात. त्याचवेळी पाकिस्तान आणि उत्तर पश्चिम भारताकडून उष्णतेचा कमी दाबाचा पट्टा तयार होतो. हवेचा एक सिद्धांत असा आहे की, ती नेहमी उच्च दाबाकडून कमी दबााकडे सरकते. त्यामुळे हिंद महासागराकडून आलेला मान्सून जेव्हा उत्तरेकडे सरकतो. तेव्हा पावसाचा रस्ता सुकर होतो. तो देशभर पसरतो आणि प्रत्येक भागाला चिंब भिजवतो. मुसळधार पाऊस पडतो. पण यावेळी उत्तर भारताकडून कमी दबाचा पट्टा क्षीण असल्याने दक्षिणेकडून येणाऱ्या थंड हवेला गती मिळालेली नाही आणि मान्सून रेंगाळला आहे.
सोमाली जेट प्रवाह सुद्धा कमकुवत आहे. हे उच्च दाब पट्ट्यांमधील अतिवेगवान प्रवाह आहेत. ते मेडागास्कर आणि सोमालियातून गुजरात आणि अरब सागराकडे येतात. त्यामुळे भारताच्या पश्चिमी किनारपट्टीसह महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, गोवा आणि गुजरातमध्ये मुसळधार पाऊस पडतो. पण यंदा हा प्रवाह सुद्धा कमकुवत झाल्याने पावसाला मोठा अडथळा आला आहे.
मान्सून कधी दाखल होणार?
भारतीय हवामान खात्यानुसार, 23 जून रोजी महाराष्ट्र, ओडिसा, झारखंड, बिहार, छत्तीसगड आणि तेलंगाणाच्या काही भागात मान्सून सक्रिय होऊ शकतो. जर मान्सूनला बळ मिळाले. राजस्थानच्या सीमावर्ती भागातील वादळी वारे कमी झाले आणि बंगाल उपसागरावरील वारे पुढे सरकले तर उत्तर भारताकडे मान्सून वेळेत कूच करेल. देशातील काही भागात हलक्या स्वरुपाचा पाऊस पडला. पण त्यात सातत्य दिसले नाही. हवामान तज्ज्ञांच्या मते मोठ्या ब्रेकनंतर मान्सूनने दमदार एंट्री घेतलेली आहे.