माढा : माढ्यातील कसबा पेठेतील ऐतिहासिक श्री विठ्ठल मंदिराचे प्राचीन वैभव जतन करण्यासाठी सॅंड ब्लास्टिंग व आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मंदिराच्या भिंतीला आतून व बाहेरून दिलेला रंग काढण्याचे काम सध्या सुरू असल्याने मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले असून पुजाऱ्यामार्फत नित्य पूजा करण्यात येत आहेत.
माढ्यातील भाविकांनी माढ्यातील विठ्ठल मंदिर संवर्धनाची मोहीम हाती घेतली असून या अंतर्गत माढ्यातील भाविक व मंदिर समितीच्यावतीने मंदिराचे प्राचीन वैभव जतन करण्यासाठी सध्या संवर्धनाचे काम हाती घेण्यात आले आहे. मंदिराच्या मूळ रचनेचे संवर्धन करण्यासाठी 'सँड ब्लास्टिंग' आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.
हे काम अत्यंत शास्त्रीय पद्धतीने करणे आवश्यक असल्याने मागील पाच दिवसांपासून मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद आहे आणखीन तीन दिवस हे काम चालण्याची शक्यता असल्याने हे मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे.
सध्या मंदिराच्या बाहेरील भिंतींचा रंग तसेच मंदिराच्या आतील भिंती व मुख्य गर्भगृहातील रंग काढण्याचे काम सुरू आहे. आणखीन तीन दिवस हे काम चालण्याची शक्यता आहे. सध्या झालेल्या कामावरून या मंदिराचे प्राचीन वैभव दिसून येत आहे. मंदिराच्या भिंती रंग काढल्यामुळे अधिक आकर्षक दिसत आहेत.