Chikalthana All-Out Raid: चिकलठाणा ग्रामीण पोलिसांचा 'ऑल आऊट' सर्जिकल स्ट्राईक; वाळू-मुरूम माफिया, गुटखा तस्कर, जुगार व अवैध दारूवर धडक कारवाईत १.५९ कोटींचा मुद्देमाल जप्त
esakal June 21, 2026 11:45 PM

चित्तेपिपंळगाव : चिकलठाणा ग्रामीण पोलिसांनी रविवार मध्यरात्री (ता. २१) राबविलेल्या ‘ऑल आऊट ऑपरेशन’मधून वाळू-मुरूम माफिया, गुटखा तस्कर, जुगार अड्डे चालक आणि अवैध दारू व्यवसायिकांवर एकाचवेळी धडक कारवाई करत तब्बल १ कोटी ५९ लाख ९२ हजार ८२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून ग्रामीण भागातील कायदा-सुव्यवस्था अधिक मजबूत करण्याचा संदेश पोलिसांनी दिला आहे.

पोलीस निरीक्षक राजेंद्र बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत अवैध खाणकाम करणाऱ्यांवर सर्वांत मोठा घाव घालण्यात आला. खाण व खनिज अधिनियम तसेच भारतीय न्याय संहितेअंतर्गत दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईत दोन जेसीबी, तीन हायवा ट्रक आणि १२ ब्रास वाळू-मुरूम असा तब्बल १ कोटी ४५ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याच मोहिमेत अन्न सुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनावर छापा टाकून प्रतिबंधित गुटखा व वाहनासह १२ लाख २८ हजार २६४ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तसेच जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई करत जुगार अड्ड्यावरून मोटारसायकल, रोख रक्कम व इतर साहित्य असा १ लाख ९३ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दारूबंदी मोहिमेअंतर्गत पोलिसांनी १०५ लिटर गावठी हातभट्टी दारू आणि १११ सीलबंद देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या. सार्वजनिक ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात ‘कोटपा’ कायद्यांतर्गत तीन गुन्हे दाखल करण्यात आले. याशिवाय मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांवर ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ मोहिमेद्वारे कठोर कारवाई करण्यात आली.

अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी अशा प्रकारच्या विशेष मोहिमा यापुढेही सातत्याने राबविण्यात येतील. कोणत्याही प्रकारच्या बेकायदेशीर व्यवसायाला पोलिसांकडून अजिबात पाठीशी घातले जाणार नाही, असा स्पष्ट इशाराही चिकलठाणा ग्रामीण पोलिस निरीक्षक राजेंद्र बनसोडे यांनी दिला आहे. ग्रामीण भागात कायद्याचा धाक निर्माण करत गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी ही कारवाई महत्त्वपूर्ण ठरत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.